अध्याय एकोणतिसावा
माझ्या भक्ताला जरी माणसाच्या सात्विक आणि तामसी ह्या दोन भिन्न स्वभावांची ओळख असली तरीही तो सज्ञानी असल्याने दोन्ही स्वभावांच्या माणसात आत्मतत्व एकच आहे ह्या जाणीवेने त्यांच्यात तो कोणताही भेद करत नाही. ज्याप्रमाणे झाडाचा जो प्रतिपाळ करतो आणि जो त्याच्यावर कुह्राडीचे घाव घालतो त्या दोघांनाही झाड सारखीच फळेफुले देते त्याप्रमाणे माझ्या भक्ताचं वर्तन असतं. त्याला दुनियेतल्या भल्याबुऱ्याशी काहीही देणेघेणे नसते. त्याला केवळ मीच सर्वत्र भरून राहिलेला दिसत असल्याने, त्याच्या दृष्टीने हे सर्व विश्व मिथ्या असते. ते जरी नजरेला दिसत असले तरी त्याला ते निरर्थक वाटते. मग काय भले आणि काय बुरे? समोरच्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती त्याला निरर्थक वाटत असल्याने त्यांच्यापैकी काही गोष्टीपासून आपल्याला अपाय होईल असे त्याच्या मनातही येत नाही कारण तो त्याठिकाणी माझेच अस्तित्व पहात असतो. त्यामुळे त्याला तेथून अपाय तर होत नाहीच उलट त्याचे माझ्याकडून रक्षणच केले जाते. उद्धवा, हा सर्व माझ्या चौथ्या भक्तीचा प्रभाव असतो. ह्याबाबतीत भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूचे उदाहरण विचारात घेण्यासारखे आहे.
प्रल्हादाला त्याच्या पित्याने त्याला किती पराकोटीचा त्रास दिला होता हे तू जाणतोसच पण त्याला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत प्रल्हादाला माझेच दर्शन घडत असल्याने त्याला त्रास देणारी व्यक्ती त्याचा केसही वाकडा करू शकली नाही. शेवटी त्याचे वडील हिरण्यकश्यपू त्याच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले, मीच तुला आता ठार मारतो. बघू तुझा नारायण तुला कसा वाचवतोय ते. त्यावर प्रल्हाद म्हणाला ईश्वर तर सर्वत्र भरलेला आहे तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे. हे ऐकल्यावर हिरण्यकश्यपू अधिकच चिडला आणि त्याने प्रल्हादाला विचारले, ह्या समोर दिसणाऱ्या खांबात तुझा ईश्वर आहे का? त्यावर प्रल्हादाने छातीठोकपणे सांगितले की, होय खांबातही ईश्वर आहे. कारण त्याला खांबातही माझे अस्तित्व जाणवत होते. प्रल्हादाने होय म्हणाल्यावर हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली. त्याक्षणी खांब दुभंगला आणि त्यातून नृसिहरूपात मी प्रकटलो. मी हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचे संरक्षण केले. माझी चौथी भक्ती करणारा भक्त त्याला त्रास देणाऱ्यातही मलाच पहात असल्याने त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून मी जागरूक असतो आणि आवश्यकतेनुसार प्रकट होऊन त्याचे संरक्षण करतो. धर्माचरण करत, आपल्या व्यवसायानुसार वाटणीला आलेले काम करत असताना जो सर्वांच्यात मला पाहतो तो सदाचारी भक्त मला अत्यंत प्रिय असतो.
उद्धवा सर्वांच्यात मला पाहणे हे सहजी शक्य होत नाही त्यासाठी सज्ञान असावे लागते. सर्व भूतात आत्माराम आहे अशी ज्याची नि:संशय खात्री असते तो आत्मज्ञानी भक्त माझी उत्तमात उत्तम भक्ती करून माझेच रूप झालेला असतो. असा भक्त अत्यंत समाधानी असतो. सर्वांच्यात मला पाहणे हेच त्याच्या भक्तीचे स्वरूप असते. समोर कुणी दुष्ट माणूस आला तरी तो त्याला बिलकुल भीत नाही हेच माझी चौथी भक्ती करणाऱ्या भक्ताचे मुख्य लक्षण असते. अशा भक्ताला मीच वंदन करतो आणि मोक्ष आपणहून त्याचे पाय पकडतो. फार काय सांगू, योग, याग, ज्ञान, ध्यान ह्या सगळ्या मला प्राप्त करून घेण्याच्या साधनांपेक्षा उत्तम साधन कोणते असे विचारशील तर माझी चौथी भक्ती करणे हेच निर्विवादपणे उत्तम साधन आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. उद्धवा नीट लक्ष देऊन ऐक. एखादी सदाचारी व्यक्ती किंवा पापकर्म करणारी व्यक्ती ह्या दोघानाही समान मानून जो त्यांच्यात भगवद्भाव पाहतो तो शुद्ध स्वभावाचा असतो. मनुष्याच्या ठिकाणी गुणदोष सरळ सरळ दिसत असूनसुद्धा, मी असं का म्हणतोय त्यामागेही एक कारण आहे. तेही तुला सविस्तर सांगतो.
क्रमश: