सैफच्या पुत्राला मिळाला दुसरा चित्रपट
सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम हा लवकरच ‘सरजमीं’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो काजोल अन् दाक्षिणात्य स्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. इब्राहिमला आता दुसरा चित्रपट देखील मिळाला आहे. इब्राहिमच्या या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल देशमुख करणार आहेत.
या चित्रपटाचे नाव ‘दिलेर’ असणार आहे. हा चित्रपट रोमँटिक स्वरुपाचा असणार आहे. याची कहाणी उत्तम असल्याने इब्राहिमने या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. इब्राहिमसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे.
दिलेर या चित्रपटाचे चित्रिकरण डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. याचे बहुतांश चित्रिकरण लंडनमध्ये पार पडणार आहे. चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी अद्याप अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली नाही. दिलेरचे चित्रिकरण सुरू करण्यापूर्वी इब्राहिम हा ‘सरजमीं’चे शिल्लक चित्रिकरण पूर्ण करणार आहे. बोमन इराणी यांचा पुत्र कायोज इराणीकडून दिग्दर्शित या चित्रपटात इब्राहिम मुख्य भूमिका साकारत आहे.