तब्बल 10 मिलीयन डॉलर्स मोजणार आयसीसी : विजेत्या, उपविजेत्याला मिळणार भरघोस बक्षीस
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी वनडे विश्वचषक यंदा भारतात खेळवला जाणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा सुरु होईल. बीसीसीआयनेही मायदेशात होणाऱ्या स्पर्धेसाठी जय्यत अशी तयारी केली आहे. अशातच शुक्रवारी आयसीसीकडून विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांना बक्षीस रक्कम जाहीर केली.
यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषकावर एकूण 10 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करणार असल्याचे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विजेत्या संघाला तब्बल 33.18 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला 16.59 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर सेमीफायनलमध्ये आव्हान संपणाऱ्या दोन्ही संघाला प्रत्येकी 6.63 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. ग्रुप स्टेजमध्ये आव्हान संपलेल्या संघाला प्रत्येकी 82.94 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचसोबत ग्रुप स्टेजमध्ये जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी जिंकणाऱ्या संघाला बक्षीस मिळणार आहे. प्रत्येक ग्रुप स्टेज सामन्यासाठी आयसीसीकडून 33.77 लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे.
आयसीसी विश्वचषकातील बक्षीस रक्कम
विजेता संघ – 33.18 कोटी
उपविजेता संघ – 16.59 कोटी
दोन सेमीफायनल संघ – प्रत्येकी 6.63 कोटी रुपये
ग्रुप स्टेजमधील सर्व संघ – प्रत्येकी 82.94 लाख रुपये