सामाजिक कार्यकर्त्यांना धक्का
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमा झुडपात टाकण्याची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी व देवदेवतांचे अपमान टाळण्यासाठी भग्न प्रतिमांचे संकलन करण्याचे काम सर्व लोकसेवा फाऊंडेशनने हाती घेतले आहे. आता या उपक्रमात भग्न प्रतिमांबरोबरच सुस्थितीत असलेल्या देवतांच्या मूर्तीही झुडपात आढळून आल्याने खेद व्यक्त होत आहे.
शनिवारी व्हॅक्सिन डेपो, रॉक गार्डन परिसरात देवदेवतांच्या सुस्थितीतील मूर्ती व भग्न प्रतिमा पाहून एका मॉर्निंग वॉकरने फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्याशी संपर्क साधला. सायंकाळी ते आपल्या सहकाऱ्यांसह व्हॅक्सिन डेपो परिसरात दाखल झाले. त्यावेळी त्यांना धक्का बसला.
भग्न प्रतिमांबरोबरच देवदेवतांच्या सुस्थितीत मूर्तीही झुडपात फेकण्यात आल्याचे आढळून आले. त्या सर्व 30 हून अधिक लहान मूर्ती व भग्न प्रतिमा त्यांनी संकलित केल्या. या उपक्रमात बाळू कणबरकर, मारुती कणबरकर, देवाप्पा कांबळे, गुरुराज वाली, गुरू सोप्पिनमठ आदींनी भाग घेतला. नागरिकांनी किमान सुस्थितीत असलेल्या देवदेवतांच्या मूर्ती तरी झुडपात टाकून त्यांचा अपमान करू नये, असे आवाहन वीरेश हिरेमठ यांनी केले आहे.