रामजन्मभूमीतील उत्खननावेळी सापडलेल्या प्राचीन अवशेषांचे छायाचित्र जारी
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. सध्या राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असतानाच उत्खना उत्खननादरम्यान सापडलेले प्राचीन मंदिराचे अवशेष छायाचित्राच्या माध्यमातून उजेडात आले आहेत. त्यात अनेक पुतळे आणि खांबांचा समावेश आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर करत खोदकामावेळी सापडलेल्या प्राचीन मूर्तींची माहिती जारी केली. हे अवशेष सध्या एकत्र गोळा करून ठेवले आहेत. चंपत राय अनेकदा मंदिराच्या बांधकामाशी संबंधित फोटो शेअर करतात.
मंदिराच्या बांधकामादरम्यान उत्खननात सापडलेल्या वस्तूंची छायाचित्रे उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामध्ये डझनभराहून अधिक मूर्ती, खांब, दगड इत्यादींचा समावेश आहे. मोठमोठ्या दगडांवर देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. फोटोमध्ये मंदिरांमध्ये बसवलेले खांबही दिसत आहेत. उत्खननादरम्यान सापडलेले हे अवशेष रामललाच्या भव्य मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.