पुणे / प्रतिनिधी :
प्रत्येकाने पक्षाकडे उमेदवारी मागावी. कोणाला उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल, सांगत पक्षाने आदेश दिल्यास पुणे लोकसभेची पोटनिवडणूक निश्चित लढवू, असे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यांनी स्पष्ट केले.
पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. भाजपचे खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत. प्रशासनाच्या पातळीवर तशी तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मला आतल्या गोटातून पुणे लोकसभेची निवडणूक होणार असल्याची माहिती मिळाली असल्याचे नुकतेच वक्तव्य करून पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा केला होता. पोटनिवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. दोन्ही बाजूने इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे. सध्या भाजपकडून पाच-सहा नावे चर्चेत आहेत. यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचेही नाव आहे.
मध्यंतरी भावी खासदार म्हणून मुळीक यांच्या नावाचे फ्लेक्स लागले होते. याबाबत विचारणा केली असता मुळीक म्हणाले, त्याबाबतीत मी मागेच स्पष्टीकरण दिले आहे, ते बोर्ड कोणी लावले हे माहित नाही. आता तो विषय जुना झाला आहे. मात्र, तुमची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना मुळीक म्हणाले, प्रत्येक पक्षामध्ये उमेदवाराची स्पर्धा नक्की असावी. आमच्या पक्षात 5-6 इच्छुक उमेदवार असतील, तर चांगलेच आहे. प्रत्येकाने पक्षाकडे उमेदवारी मागावी. कोणाला उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल. आमची कायमची पद्धत आहे. पण अखेरीस पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करायचा हे आमचे तत्त्व आहे. कमळ हाच आमचा उमेदवार आहे. मात्र, पक्षाने आदेश दिल्यास आपणदेखील निश्चित निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.