मगरीच्या जबड्यात शिरून अन्न मिळवितो हा पक्षी
मगर किती धोकादायक असते हे सर्वजण जाणतात. काही मोजकेच लोक मगरीनजीक जाण्याचे धाडस करू शकतात. मगरीने स्वत:च्या जबड्यात एखादी गोष्ट धरल्यास ती पुन्हा मिळविणे अशक्य आहे. लहान-मोठे प्राणी तर दूरच सिंह देखील या मगरींनजीक जाणे टाळतो. भारतात चंबळ नदीत सर्वाधिक मगरी आढळून येतात. यानंतर बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात वाहणारी गंडक नदी मगरींचे मोठे आश्रयस्थान आहे. तेथेच मगरीच्या जबड्यात शिरुन त्याच्या दातात अडकलेल्या मांसाच्या तुकड्यांना खाणारा आणि मग सहिसलामत बाहेर पडणारा एक जीव आहे.
पश्चिम चंपारण्यच्या व्हीटीआरमध्ये प्लोवर नावाचा एक पक्षी आहे, ज्याचा आहार मगरीच्या जबड्यात असतो. मगर जेव्हा एखाद्याला स्वत:ची शिकार करते तेव्हा तिच्या दातात मांसाचे तुकडे अडकून राहतात. या तुकड्यांना बाहेर काढणे मगरीसाठी अशक्य असते. अशा स्थितीत प्लोवर नावाचा पक्षी या मांसाच्या तुकड्यांना स्वत:चा आहार करतो. प्लोवर पक्षी अत्यंत सहजपणे मगरीच्या जबड्यात शिरतो आणि मांसाचे तुकडे खाऊन आरामात बाहेर पडतो. विशेष बाब म्हणजे यामुळे मगरीला कुठलेच नुकसान होत नाही.
मगर जेव्हा आपल्या भक्ष्याचे मांस खाते, तेव्हा त्याच्या मांसाचे तुकडे तिच्या दातांत अडकतात. अशा स्थितीत मगर स्वत:चा जबडा उघडा ठेवून आरामात पहुडते. हे तुकडे प्लोवर पक्ष्याचे आहार असतात. याचमुळे प्लोवर मगरीच्या जबड्यात शिरून दातांमध्ये अडकलेले तुकडे खात असतो. या प्रक्रियेत प्लोवरला अन्न मिळते तर मगरीचे दात स्वच्छ होत असतात. याचमुळे प्लोवर पक्षाला मगरीचा डेंटिस्ट देखील म्हटले जाते. मगर अन् प्लोवर परस्परांवर निर्भर असतात.