मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : गोव्यामुळे ‘इफ्फी’च्या नावलौकिकात वाढ,देश-विदेशांतील 270 चित्रपटांची रेलचेल
पणजी : येत्या 20 नोव्हेंबरपासून पणजीत सुरु होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यावर्षी गोमंतकीय विभागात प्रीमियर आणि नॉन प्रीमियर अशा दोन वेगळ्या विभागांतर्गत गोव्यातील सात चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, सीईओ अंकिता मिश्रा उपस्थित होते.
‘इफ्फी’च्या नावलौकिकात वाढ
गोवा 2004 पासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) यशस्वीपणे यजमानपद भूषवत आहे. जगभरातील सहभागींना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवणारे व्यासपीठ म्हणून इफ्फीचा नावलौकिक आहे. अलिकडच्या वर्षांत, गोव्यातील चित्रपट उद्योगाने झेप घेतली असून राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
इफ्फीत प्रदर्शित होणार गोमंतकीय चित्रपट
यंदा 54 व्या इफ्फीत गोमंतकीय विभागाच्या प्रीमियर आणि नॉन प्रीमियर अशा दोन विभागाकरिता 20 प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी 7 चित्रपटांची निवड करण्यात आली. हालक्यून क्रिएशन्स निर्मित ‘गाथन’, सहित स्टुडिओचा ‘पीस लिली सॅन्ड कॅसल’, ट्रॉय रिबेरियोचा ‘द विटनेस’, ब्ल्यू रे स्टुडिओचा ‘यशोदा’, राजाराम गोपाल तुरीचा ‘मारवत’, बिग बॅनर एंटरटेनमेंटचा ‘मोग’, प्रसाद क्रिएशन्सचा ‘क्रेझी मोगी’ या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. चित्रपटांची निवड समितीचे अध्यक्ष मानस चौधरी, सदस्य अजित राय आणि कामाख्या नारायण सिंग यांनी केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्व तयारी पूर्णत्वाकडे
उद्घाटन सोहळा सोमवार दि. 20 रोजी सायं. 5 वा. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे होणार आहे. इफ्फीची तयारी पूर्ण होत आली असून फक्त श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, कला अकादमी याठिकाणी काही काम राहिले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
तब्बल 270 चित्रपटांची रेलचेल
आंतरराष्ट्रीय विभागात 198 चित्रपट आणि 13 जागतिक प्रीमीयर होणार आहेत. तसेच संपूर्ण महोत्सवात 270 चित्रपट दाखविण्यात येतील. सम्राट अशोक आणि झी स्क्वेअर ही दोन थिएटर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. याचबरोबर महोत्सव दिव्यांगासाठी प्रवेशयोग्य बनविण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. इफ्फीसाठी कला अकादमीसुद्धा वापरण्यात येणार असून मास्टरक्लास आणि इन कर्न्व्हेसेशन हे कार्यक्रम तेथे होतील. कला अकादमीचे नुकतेच उद्घाटन झाल्यामुळे त्यातील चित्रपट स्क्रीनिंगसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी, स्क्रीन उपलब्ध नसल्यामुळे यंदा चित्रपट स्क्रीनिंग कला अकादमीत होणार नाही. ‘ओपन एअर स्क्रीनिंग’ मिरामार, रवींद्र भवन मडगाव आणि हणजूण जीटीडीसी पार्किंग याठिकाणी होईल. तसेच स्थानिक, पर्यटकांकरिता ‘सिने मेला’ हे मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा प्रयत्न
इफ्फीसाठी गोवा कायमस्वरूपी स्थळ झाले असले तरी महोत्सवासाठी कायमस्वरूपी कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे फिल्मसिटी तयार करण्यासाठी कोमुनिदाद जमिनी देण्याकरिता तसेच इतर प्रक्रियासुद्धा तयार असून गोवा मनोरंजन सोसायटी काणकोण येथील जमीन लीझ तत्त्वावर घेऊन फिल्मसिटी बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. या फिल्मसिटीमुळे रोजगाराच्या दृष्टीने गोमंतकीयांना फायदा होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.