‘द कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ : नऊ दिवसांच्या महोत्सवात 200 चित्रपटांचे प्रदर्शन,103 आंतरराष्ट्रीय चित्रपट, 13 जागतिक प्रिमियर शो
पणजी : राज्यात आज सोमवार दि. 20 नोव्हेंबरपासून 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत असून त्याचे उद्घाटन सायंकाळी 5 वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता शाहीद कपूर, श्रीया सरन व इतर अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून रंग भरणार आहेत. ‘द कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. ई श्रीधरन पिल्लाई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक इतर मंत्रीगण, मान्यवर मंडळी उद्घाटनास उपस्थित रहाणार आहेत.
मायकल डगलस यांना जीवनगौरव
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मायकल डगलस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार याच महोत्सवात प्रदान करण्यात येणार असून 20 ते 28 नोव्हेंबर असे 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सुमारे 200 चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यंदा प्रथमच 13 चित्रपटांचे जागतिक प्रिमियर शो महोत्सवात आखण्यात आले आहेत.
दोनशे चित्रपटांचे होणार प्रदर्शन
महोत्सवासाठी सुमारे 3000 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील एकंदर 200 चित्रपट निवडण्यात आले असून त्यात एकूण 103 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त डगलस हे 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात येणार असून महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
पार्किंगसाठी चोख व्यवस्था
महोत्सवाचा उद्घाटन समारोप सोहळा मुखर्जी स्टेडियमवर रंगणार असून बाहेरील मोकळ्या जागेत चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी आवश्यक ती तयारी केली असून इतर विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्यात आले आहेत.
आयनॉक्स परिसर झगमगला
महोत्सवाचे मुख्य केंद्र असलेला पणजीतील आयनॉक्स परिसर सुशोभित करण्यात आला असून रस्त्याच्या दुतर्फा रोषणाईचा झगमगाट करण्यात आला आहे. येथील भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर अनेक ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली असून झाडांवरही विद्युत रोषणाईचे रंग भरण्यात आले आहेत.
मान्यवरांची मांदियाळी
चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी नशरत भरूचा, विजय सेभूपार्था, सारा आली खान, पंकज त्रिपाठी, सनी देवल, करण जोहर, शंतनू मोईत्रा, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, अपरशक्ती खुराना, करीष्मा तन्ना हे चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनास हजेरी लावणार असल्याची माहिती देण्यात आली.