मडगाव पालिकेकडून काम थांबविण्याचा आदेश
मडगाव : मडगावच्या ऐतिहासिक डॉ. राम मनोहर लोहिया मैदानाला भिडून असलेल्या एका हॉटेलने अंतर्गत दुरुस्तीसाठी अर्ज करून हॉटेलच्या बाहेरील खुल्या जागेत पक्के बांधकाम केल्याने हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊन त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱयांना जाग आली. शनिवारी सदर काम बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या सूत्रांनी दिली. शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आता सोमवारी सदर हॉटेलमालकाला अधिकृत नोटीस जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी व्हॉटसऍपवर सदर बांधकामाचे फोटो व्हायरल केले होते. त्यानंतर कित्येकांनी या कृतीबद्दल संताप व्यक्त केला होता. स्थानिक नगसेविकेने याबद्दल तांत्रिक विभागाकडे विचारणा केली असता संबंधिताने अंतर्गत दुरुस्तीसाठी अर्ज केला होता, मात्र प्रत्यक्षात त्याने खुल्या जागेत, त्याही लोहिया मैदानाला भिडून असलेल्या जागेत पक्के बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ते थांबविण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.