ऑनलाईन टीम / तरुण भारत :
संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत काँग्रेसच्या खा. सोनिया गांधी यांनी भाग घेत विधेयकाला पाठिंबा दर्शवला.
सोनिया गांधी म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा महिलांचा सहभाग निश्चित करणारे विधेयक राजीव गांधी यांनी आणले होते. राज्यसभेत ते सात मते कमी मिळाल्याने मंजूर होऊ शकले नव्हते. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने ते मंजूर केले. त्यामुळेच आज देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाखांच्या जवळपास महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत.
महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल. महिलांचे योगदान स्वीकारणे आणि त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्याची हीच सर्वात योग्य वेळ आहे. काँग्रेसचा या विधेयकाला पाठिंबा आहे. सरकारने लवकरात लवकर हे विधेयक लागू करावे, असेही त्या म्हणाल्या.