वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रिकेट प्रमाणेच आता फुटबॉल क्षेत्रातही व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) पद्धतीची अमलबजावणी नजीकच्या काळामध्ये केली जाणार आहे. दरम्यान 2025-26 च्या राष्ट्रीय फुटबॉल हंगामामध्ये पहिल्यांदा ‘व्हीएआर’ची अमलबजावणी क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत केली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस एम. सत्यनारायण यांनी दिली.
व्हीएआर हे तंत्रज्ञान फुटबॉल क्षेत्रात चांगलेच अवगत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या तंत्रज्ञानामध्ये असलेल्या कांही त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला बरेच यश मिळाले. 2016-17 च्या फिफाच्या फुटबॉल स्पर्धांमध्ये पहिल्यांदा व्हीएआरची अमलबजावणी करण्यात आली होती. फुटबॉल क्षेत्रामध्ये गोल नोंदविताना बऱ्याच वेळेला बचाव फळीतील खेळाडूंकडून अनेक चुका घडू शकतात. पेनल्टीचा निर्णय घेण्यासाठी व्हीएआर हे नवे तंत्रज्ञान अचूक राहील. सामन्यातील कांही क्षणात फुटबॉलपटूंकडून दांडगाईचा खेळ केला जातो. त्यावेळी व्हीएआरची अमलबजावणी करत या घटनेची पूर्ण पडताळणी करून खेळाडूंना थेट लाल कार्ड दाखविण्याची सुविधा आहे. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये क्लबस्तरीय फुटबॉलमध्ये व्हीएआर या तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वीच करण्यात आला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्हीएआरची अमलबजावणी सर्वप्रथम करण्यात आली होती.