न्यायालयाकडून आर्थिक दंडही : ‘गँगस्टर अॅक्ट’ अंतर्गत दोषी, मुख्तारला 10, अफजलला चार वर्षांची शिक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, गाझीपूर
गाझीपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने शनिवारी माफिया मुख्तार अन्सारी याला एका अपहरण-हत्या प्रकरणात 10 वर्षांची आणि त्याचा भाऊ बसपा खासदार अफजलला 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने मुख्तारला 5 लाख रूपये आणि अफजलला 1 लाख ऊपये दंड ठोठावला आहे. अन्सारी बंधू 30 दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकतील. अफजलला कडेकोट बंदोबस्तात गाझीपूर कारागृहात पाठवण्यात आले असून मुख्तार अन्सारी आधीच बांदा कारागृहात कैद आहे.
शनिवारी झालेल्या सुनावणीसाठी मुख्तार व्हिडिओ कॉनफरन्सिंगद्वारे सहभागी झाला होता. तर, अफझल अन्सारी प्रत्यक्षपणे न्यायालयात पोहोचला होता. अफझलला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा सुनावल्यामुळे त्याचे संसद सदस्यत्व रद्द होऊ शकते. सरकारी वकील नीरज श्रीवास्तव यांनी याला दुजोरा दिला आहे.
भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येनंतर 2007 मध्ये अन्सारी बंधूंविऊद्ध ‘गँगस्टर अॅक्ट’चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला राय यांच्या हत्येनंतर झालेल्या जाळपोळ आणि व्यापारी नंदकिशोर रूगटा यांच्या अपहरण-हत्येवर आधारित होता. कृष्णानंद राय खून प्रकरणात न्यायालयाने अन्सारी बंधूंची निर्दोष मुक्तता केली. पण, गँगस्टर अॅक्टअंतर्गत त्यांना कारावास ठोठावण्यात आला आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी दोन्ही भावांवर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा निर्णय 15 एप्रिल रोजी येणार होता. मात्र, न्यायाधीश रजेवर गेल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
मुख्तारची 8 महिन्यांत चौथी शिक्षा
मुख्तार अन्सारी याला 22 सप्टेंबर 2022 ते 29 एप्रिल 2023 पर्यंत एकूण 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी, मुख्तारला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 7 वर्षांची आणि दुसऱ्या दिवशी गुंड प्रकरणात न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांनी 5 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर 85 दिवसांनी म्हणजेच 15 डिसेंबर 2022 रोजी मुख्तारला काँग्रेस नेते अजय राय यांचा मोठा भाऊ अवधेश राय हत्या आणि अतिरिक्त एसपीवरील हल्ल्यासह एकूण 5 खटल्यांमध्ये 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर शनिवारी गॅगस्टर अॅक्टअंतर्गत प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली आहे.
बसप खासदार अफजलचे संसद सदस्यत्व जाणार
शिक्षेनंतर अफझल अन्सारीचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. कारण संसदेच्या नियमांनुसार, दोन किंवा त्याहून अधिक वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा झालेल्या कोणत्याही सदस्याला आपोआप अपात्र ठरवले जाते. अलीकडेच 2019 च्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर आणि दोन वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या नियमांतर्गत संसदेचे सदस्यत्व गमावले होते.