भारतासह अनेक देशांकडून मिळविली अब्जावधींची देणगी ः 13 खात्यांमध्ये लपविला काळा पैसा
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
8 वर्षे जुन्या विदेशी अर्थसहाय्य (फॉरेन फंडिंग) प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष अडचणीत आला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान यांना नोटीस बजावून तुमची सर्व खाती का गोठविली जाऊ नयेत, अशी विचारणा केली आहे. इम्रान आणि पीटीआयने याप्रकरणी यापूर्वीही आयोगासमोर बाजू मांडली नव्हती.
पीटीआयने 34 विदेशी नागरिक आणि 351 कंपन्यांकडून देणगी स्वीकारली. केवळ 8 खात्यांची माहिती दिली, तर 13 बँक खात्यांमध्ये काळा पैसा ठेवला आणि त्याची माहिती लपविली. याचबरोबर 3 खात्यांची तपासणी सुरू असल्याचे तेथील निवडणूक आयोगाने म्हटले आहे. इम्रान खान यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.
इम्रान खान आणि पीटीआयने अमेरिकेत राहणाऱया भारतीय वंशाच्या उद्योजिका रोमिता शेट्टी यांच्याकडून सुमारे 14 हजार डॉलर्सची देणगी स्वीकारल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. भारतासमवेत अनेक देशांमधून अब्जावधी रुपयांचा निधी मिळविला आणि याची माहिती सरकार, निवडणूक आयोग किंवा अर्थ मंत्रालयाला दिली नसल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे.
इम्रान खान आता मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान राजा यांना हटविण्याची मागणी करत आहेत. खान आणि त्यांच्या पक्षाची सर्व खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच इम्रान यांच्यावर निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाऊ शकते. याचबरोबर पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात विदेशातून कुठल्याही प्रकारची राजकीय देणगी मिळविणे गुन्हा आहे.
इम्रान यांच्या पक्षाच्या सदस्याची तक्रार
इम्रान खान यांनी 1996 मध्ये पीटीआयची निर्मिती केली होती. याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक अकबर बाबर हे इम्रान यांचे निष्ठावंत मानले जात होते. बाबर यांनीच 2014 मध्ये इम्रान यांच्या विरोधात न्यायालयात फॉरेन फंडिंग प्रकरणी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे चौकशीसाठी पाठविले होते. 14 नोव्हेंबर 2014 पासून याप्रकरणी सुनावणी सुरू होती. परंतु सैन्याच्या अभयामुळे इम्रान याप्रकरणी आतापर्यंत बचावले होते. परंतु इम्रान यांचे सरकार कोसळताच आणि त्यांनी सैन्याला धमकाविणे सुरू केल्यावर याप्रकरणाची सुनावणी नियमित स्वरुपात होऊ लागली.