वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसून येत आहे. कॅनडात खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येला भारत कारणीभूत आहे, असा आरोप करुन ट्रूडो यांनी काहीकाळ सनसनाटी निर्माण केली होती. तथापि, जगातून त्यांना या प्रकरणी फारसा सक्रिय प्रतिसाद न मिळाल्याने आता कॅनडाला सौम्य भूमिका घ्यावी लागत आहे.
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांची अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री अँथोनी ब्लिंकन यांच्याशी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी आरोप तर केला, पण त्याच्या पुष्ट्यार्थ कोणताही विश्वसनीय पुरावा दिला नाही, यावर जयशंकर यांनी अमेरिका दौऱ्यात भर दिला. इतकेच नव्हे, तर कॅनडाच भारतविरोधी दहशतवादाला स्वत:च्या भूमीवर कसे प्रोत्साहन देत आहे, याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे चर्चेची दिशाच वेगळी झाली, असे आता स्पष्ट होत आहे.
महत्त्वाची भेट
ब्लिंकन यांच्याशी जयशंकर यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली गेली. या भेटीकडे कॅनडासह इतर अनेक देशांचे लक्ष होते. निज्जर हत्या प्रकरणाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला जाईल, असे ब्लिंकन यांनी आपल्याला आश्वासन दिले आहे, असे भेटींआधीच प्रतिपादन करुन ट्रूडो यांनी या भेटीसंबंधीचे औत्सुक्य अधिकच वाढविले होते. ब्लिंकन आणि जयशंकर यांची कॅनडावर चर्चाही झाली. पण ती चर्चा भारताने निज्जर प्रकरणी काय केले यावर होण्यापेक्षा कॅनडात खलिस्तानवादी दहशतवाद असा फोफावत आहे यावर झाली. तसेच कॅनडाने हा दहशतवाद रोखण्यासाठी काय केले पाहिजे, यावरही विचार झाला. परिणामी कॉनडाचा हेतू असफल झाला, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
निवेदनांमध्ये उल्लेखही नाही
दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्यानंतर निवेदने प्रसिद्धीस देण्यात आली. मात्र, त्यांच्यात निज्जर हत्या प्रकरणाचा उल्लेखही नव्हता. ही चर्चा द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्याविषयी होती, असे निवेदनांमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या प्रकरणाला फारसे महत्त्व न दिल्याचे स्पष्ट झाले. तसेच चर्चा कॅनडाच्या कृतींवर झाली हे ही आता उघड झाले आहे. एकंदर हे प्रकरण भारताने मुत्सद्दीपणाने हाताळले असे दिसत आहे.
ते पुन्हा असे बोलणार नाहीत
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो हे पुन्हा अशी भारतविरोधी विधाने करणार नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांच्याच पक्षाचे चंद्रा आर्या यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणी भारताशी पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. यावरुन आता त्यांचा पक्ष सौम्य भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.