यो-यो चाचणीत सर्वाधिक 18.7 गुणांची कमाई
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय संघातील अनुभवी खेळाडू विराट कोहली हा आपल्या फलंदाजीसह आपल्या फिटनेससाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर असताना विराटच्या फिटनेसच्या चर्चा सुरू असतात. मात्र युवा फलंदाज शुबमन गिलने फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीलाही मागे सोडलं आहे. बेंगळूर येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शिबिरामध्ये गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुणांची कमाई केली आहे. तर विराटने 17.2 गुणांची कमाई केली.
वास्तविक असे मानले जाते की जे खेळाडू सर्वात तंदुरुस्त असतात, ते यो-यो चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळवतात. यो-यो चाचणी हे खेळाडूंच्या फिटनेसचे मोजमाप करण्याचे प्रमाण आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने अनेकदा यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोअर केला होता, मात्र यावेळी गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, यो-यो टेस्ट पास होण्यासाठी 16.5 गुण मिळवावे लागतात. यापूर्वी पास होण्यासाठी फक्त 16.1 गुणांची अट होती. सराव सत्रात सामील होण्यापूर्वी खेळाडूंची यो-यो टेस्ट झाली. यात सर्व खेळाडू पास झाले. बहुतेक खेळाडूंचा स्कोर हा 16.5 ते 18 असा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यामध्ये गिल यो-यो टेस्टमध्ये चांगले गुण मिळवत पास झाला. त्याने सर्वाधिक 18.7 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, विराटनेही यो-यो टेस्टमध्ये चांगले गुण मिळवले, पण गुणांच्या बाबतीत तो गिलच्या मागे पडला आहे.
संघ व्यवस्थापनाची नाराजी
दरम्यान, गुरुवारी विराटने सोशल मीडियावर यो-यो टेस्टमधील गुण सार्वजनिक केले होते. विराटने आपली खासगी माहिती सार्वजनिक केल्याने बीसीसीआय त्याच्यावर नाराज आहे. विराटने असे केल्यानंतर बीसीसीआयने इतर खेळाडूंना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, यो-यो चाचणीचे गुण गोपनीय माहितीमध्ये येतात आणि कोणत्याही परिस्थितीत ते उघड करू नयेत. बोर्डाने खेळाडूंना त्यांची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास मनाई केली आहे.