वर्दळीचे रस्ते सोडून सरकारी कार्यालयांकडे मोकाट जनावरांचा मोर्चा
बेळगाव : मोकाट जनावरांचा वावर शहर आणि उपनगरांमध्ये वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासन कोणत्याच उपाययोजना आखत नाही. परिणामी याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे मोकाट जनावरांनी आपला मोर्चा आता सरकारी कार्यालयांच्या परिसरात वळविल्याचे दिसते. उपनोंदणी कार्यालयासमोरच मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला होता. भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा वावर शहर परिसरात वाढला आहे. ठिकठिकाणी मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याबाबत गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असो किंवा बसस्थानक असो त्याठिकाणी मोकाट जनावरे दिसतातच. त्यामुळे नागरिक बसथांब्यातून बाहेर आणि जनावरे आत, अशी अवस्था बेळगाव शहरातील बसथांब्यांची झाली आहे. गुरुवारी शहरातील गणेशोत्सवाची धामधूम पाहून जनावरांनीही निवांत जागा शोधली. उपनोंदणी कार्यालयासमोरच मोकाट जनावरे स्थानापन्न झाली. त्यामुळे त्यांना हटविणे अवघड झाले होते. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागला. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व त्यांना गोशाळेत पाठवून द्यावे, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना त्रास देण्यातच मनपाने धन्यता मानल्याचा आरोप करण्यात येत आहे.