सामाजिक सलोखा बिघडवल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी सोशल मीडियावरील संदेशांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सामाजिक स्वास्थ्याला धक्का पोहोचेल, अशी कसलीही पोस्ट प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासंबंधी शहर व उपनगरात जागृती करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात प्रत्येक पोलीस स्थानकात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष विभाग कार्यरत आहे. सण व उत्सवाच्या काळात सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचवणारे संदेश पाठविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविण्याआधी विचार करावा, आपल्या एका पोस्टमुळे समाजहिताला धक्का पोहोचणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. जर सोशल मीडियावरील पोस्टमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्यास संबंधितांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे. नागरिकांनीही या काळात अफवांवर विश्वास ठेवू नये. बेकायदा व समाजघातक कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविषयी जवळच्या पोलीस स्थानकाला किंवा 112 ला माहिती देण्याचे आवाहनही पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी केले आहे.