पुणे / प्रतिनिधी :
देशाची जैव वैद्यकीय अर्थव्यवस्था सन 2014 पूर्वी दहा बिलियन डॉलर होती. सध्या ती 80 बिलियन डॉलरपर्यंत वाढलेली आहे. आगामी काळात जैववैद्यकीय अर्थव्यवस्था 150 बिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य आहे. महागडे औषध उपचार कमी खर्चात करणे शक्य होणार आहे. तरुण पिढीमधील चयापचयाचे आजार वाढत आहेत. यावर उपचार करणे हे भविष्यातील डॉक्टरांचे आव्हान आहे. त्यामुळे ते देशाची तरुण पिढीचे रक्षण करणारे योद्धे ठरतील, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
आर्म फोर्स मेडिकल कॉलेज ( एएफएमसी) येथे आयोजित ‘इमर्जिंग टेंड्स इन द प्रॅक्टिस ऑफ मेडिसीन’ या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. या वेळी लेफ्ट. जनरल नरेंद्र कोतवाल, लेफ्ट जनरल दलजीतसिंग, ब्रिगेडियर जे मुथूकृष्णन, मेजर जनरल डी सदानंद, केंद्रीय बायोटेक्नोलॉजी विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले उपस्थित होते.
जितेंद्र सिंह म्हणाले, एएफएमसी देशातील पहिले नामांकित लष्करी वैद्यकीय महाविद्यालय आहे. डॉ. बी. सी. रॉय यांनीही संस्था निर्मितीत अमूल्य योगदान दिले. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने एखाद्याच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची मला सवय आहे. कोविड काळात अनेकजण आयुर्वेदामध्ये औषध शोधत होते तसेच वैद्यकीय विभागास कष्टपूर्वक जबाबदारीचे काम शिकवले गेले. टेलीमेडीसिन हे उभरते क्षेत्र असून दुर्मिळ भागात ज्या नागरिकांनी डॉक्टर गावात पाहिले नाही, त्यांच्यासाठी टेलीमेडीसिन उपयोगी आहे.
माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी मी याचा वापर केला आहे. सीमावर्ती भागात डॉक्टर उपलब्ध नसताना घरापर्यंत डॉक्टर पोहचवण्याची व्यवस्था टेलीमेडीसिनमुळे शक्य झाली आहे. इस्रोचे टेलीमेडीसिन मध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. बदलत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोगदेखील करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.