मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा सहभाग
प्रतिनिधी /पणजी
आंतरराष्ट्रीय योगदिन राज्यात उत्साहाने विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. त्यात मुख्यमंत्री तसेच मंत्री, आमदार, राजकीय नेते विविध पक्षांचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी शाळकरी मुले सहभागी झाली होती. सरकारी पातळीवरील मुख्य कार्यक्रम बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी यावेळी योग कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘मानवतेसाठी योग’ ही संकल्पना त्यासाठी आखण्यात आली होती.
योगाचे बरेच फायदे असून लोकांनी वर्षाचे 365 दिवस योग करावा. यामुळे आरोग्य, मन, चांगले प्रसन्न राहते, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर येथे देशपातळीवरील योगदिन कार्यक्रमात नेतृत्व केले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दोन वारसा स्थळांवर योग दिन
गोव्यातील दोन वारसा स्थळांवर योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ओल्ड गोवा चर्च व आग्वाद किल्ल्यावर योगदिन कार्यक्रम झाला. केंद्रीय उद्योगमंत्री प्रल्हाद सिंग पटेल व पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे अग्वाद किल्ल्यावरील कार्यक्रमात सहभागी झाले. ओल्ड गोवा येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. लोकांनी नियमित योग केल्यास आयुर्मान वाढण्यास मोठी मदत होणार आहे. योगामुळे आरोग्य चांगले राहते. योग ही आपल्या देशाने जगाला दिलेली मोठी देणगी आहे, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी यावेळी नमूद केले.
दोनापावला येथील राजभवनावरहीही राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी योगदिन साजरा केला. विविध शाळा, कॉलेज, संस्था, संघटनांतर्फे तसेच कार्यक्षेत्राच्या ठिकाणीही योगदिन कार्यक्रम घेण्यात आले. त्यात शाळकरी मुले, मुलींसह लोकांनी मोठय़ा संख्येने उत्साहात सहभाग दर्शवून योगदिन यशस्वी केला.