अमेरिकेतील वाढत्या महागाईचा परिणाम, इन्फोसिस नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअरबाजारामध्ये बुधवारी आठवडय़ाच्या तिसऱया दिवशी मोठय़ा प्रमाणामध्ये चढउतार दिसून आला. आयटी कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 224 अंकांनी घसरून 60,346 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 66 अंकांच्या घसरणीसह 18,003 अंकांवर बंद झाला. बाजारात गेली चार सत्रे तेजी दिसून आली होती. बुधवारी मात्र अमेरिकेत महागाईने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवरती शेअरबाजार काहीसा डळमळीत असताना दिसला. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजी दाखवत होते.
बुधवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 30 पैसे कमकुवत झाला होता. अमेरिकेतील ऑगस्टमधील महागाईचे आकडे सादर करण्यात आले असून याने अमेरिकेत चिंता व्यक्त केली जात आहे. याचेच काहीसे नकारात्मक परिणाम शेअरबाजारावर दिसून आले. जगातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून असलेल्या अमेरिकेचा महागाई दर हा काहीसा जास्त दिसून आल्याने अमेरिकेतील शेअरबाजारातही मोठय़ा प्रमाणात घसरणीचा सिलसिला दिसला. ज्याचा अर्थातच परिणाम भारतीय आणि इतर देशांच्या शेअरबाजारांवर कमी-अधिक प्रमाणामध्ये दिसून आला. सुरुवातीला सकाळी 10 च्या सुमारास सेन्सेक्स 631 अंकांनी घसरून 59,939 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 17,893 वर व्यवहार करत होता. टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस यांचे समभाग मोठय़ा प्रमाणात घसरलेले पाहायला मिळाले. याआधी मंगळवारी चौथ्या सत्रामध्ये सेन्सेक्स 455 अंकांनी तेजी दाखवत बंद झाला होता. तर निफ्टी 133 अंकांनी वाढला होता. सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. आयटी, रिअल्टी, मेटल निर्देशांकांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.