डी कॉक सामनावीर, विंडीजचा 6 गड्यांनी पराभव, चार्ल्सचे शतक वाया
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
क्रिकेटच्या टी-20 प्रकारात दक्षिण आफ्रिकेने पाठलाग करत विश्वविक्रमी विजय रविवारच्या सामन्यात नेंदविला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत झालेल्या दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने विंडीजचा 6 गड्यांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी जोहान्सबर्गमध्ये खेळविला जाईल. 44 चेंडूत जलद शतक झळकविणाऱ्या क्विंटॉन डी कॉकला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर विंडीजने 20 षटकात 5 बाद 258 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 259 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 18.5 षटकात 4 बाद 259 धावा जमवित हा सामना 7 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी जिंकला. डिकॉकने तुफान फटकेबाजी करत शतक झळकविले. तर विंडीजच्या चार्ल्सचे शतक वाया गेले.
या सामन्यात विंडीजच्या डावात जॉन्सन चार्ल्सने 46 चेंडूत 11 षटकार आणि 10 चौकारांसह 118 धावा झोडपताना मेयर्ससमवेत दुसऱ्या गड्यासाठी 135 धावांची शतकी भागीदारी केली. सलामीचा किंग पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर मेयर्स आणि चार्ल्स यांनी आक्रमक खेळी केली. मेसर्यने 27 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा जमविल्या. पूरन 2 धावांवर बाद झाला. चार्ल्स जेनसेनच्या गोलंदाजीवर 14 व्या षटकात त्रिफळाचीत झाला. चार्ल्स बाद झाल्यानंतर कर्णधार पॉवेल आणि शेफर्ड यांनी पाचव्या गड्यासाठी 26 चेंडूत 57 धावांची भर घातली. पॉवेलने 19 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 28 तर शेफर्डने 18 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 41 तसेच स्मिथने 1 षटकारासह नाबाद 11 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 22 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे पार्नेलने 43 धावात 2 तर जेनसेनने 52 धावात 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना डी कॉक आणि हेन्ड्रीक्स या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी सुरू केली. या जोडीने 10.5 षटकात 152 धावा झोडपल्या. हेन्ड्रीक्सने 28 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 68 धावा झळकविल्या. रॉसोने 4 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 16, मिलरने 10 चेंडूत 1 चौकारासह 10, डी कॉकने 44 चेंडूत 8 षटकार आणि 9 चौकारांसह 100 धावा झळकविल्या. कर्णधार मार्करम आणि क्लासेन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मार्करमने 21 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 38 तर क्लासेनने 7 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये 13 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे होल्डर, स्मिथ, रिफेर आणि पॉवेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉकचे टी-20 प्रकारातील हे पहिले दणकेबाज शतक ठरले. हेन्ड्रीक्स आणि डी कॉक या सलामीच्या जोडीने केलेली 152 धावांची भागीदारी विंडीजला पराभवाच्या दिशेने नेली. विंडीजच्या चार्ल्सने टी-20 प्रकारात 39 चेंडूत शतक झळकविले. विंडीजतर्फे चार्ल्सचा हा टी-20 प्रकारातील नवा विक्रम आहे. यापूर्वी म्हणजे 2016 साली विंडीजच्या ख्रिस गेलच्या नावावर टी-20 प्रकारात सर्वात जलद शतकाचा विक्रम नोंदविला गेला होता. गेलचा विक्रम चार्ल्सने या सामन्यात मागे टाकला. टी-20 प्रकारात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, भारताचा रोहित शर्मा आणि झेकचा सुदेश विक्रमशेखरा यांनी प्रत्येकी 35 चेंडूत जलद शतक नोंदविण्याचा विक्रम केला आहे. टी-20 प्रकारामध्ये 500 पेक्षा अधिक धावा नोंदविण्याचा हा विक्रम सामना ठरला आहे.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 20 षटकात 5 बाद 258 (चार्ल्स 118, मेयर्स 51, किंग 1, पूरन 2, पॉवेल 28, शेफर्ड नाबाद 41, स्मिथ नाबाद 11, अवांतर 6, जेनसेन 3-52, पार्नेल 2-43), द. आफ्रिका 18.5 षटकात 4 बाद 259 (डी कॉक 100, हेन्ड्रीक्स 68, रॉसो 16, मिलर 10, मार्करम नाबाद 38, क्लासेन नाबाद 16, अवांतर 11, होल्डर 1-48, स्मिथ 1-36, रिफेर 1-42, पॉवेल 1-27).