प्रतिनिधी /धारबांदोडा
कुळे-शिगांव पंचायत क्षेत्रातील शिगांव येथे बांधकाम खात्यातर्फे बांधण्यात आलेल्या अग्रशाळा, स्मशानभूमी व मंडपाचे उद्घाटन आमदार गणेश गावकर यांच्याहस्ते करण्यात आले. वेळीपवाडा-शिगांव येथील श्री सातेरी मंदिराच्या प्रांगणात अंदाजे रु. 20 लाख खर्चून अग्रशाळेचे बांधकाम करण्यात आले आहे.
वानसायवाडा येथे रु. 20 लाख खर्चून नवीन स्मशानभूमी तर तुरीमरड येथील आजोबा देवस्थानासमोर रु. 20 लाख खर्चून मंडप व रंगमंच बांधण्यात आला आहे. या सर्व कामांचे उद्घाटन आमदार गणेश गावकर यांच्याहस्ते करण्यात आले. सातेरी मंदिराजवळील अग्रशाळेचा विस्तार करायचा असल्यास तसा प्रस्ताव देवस्थान समितीने द्यावा अशी सूचना आमदार गणेश गावकर यांनी यावेळी केली. विकास साधाताना कोणत्याच प्रकार मतभेद केला जाणार नाही. विकासाच्या प्रक्रियेत जनतेचा सहभाग महत्वाचा असून कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात विकास करायला खूप वाव आहे. जनतेचे हित लक्षात घेऊन विकास साधला जाईल असे ते म्हणाले. यावेळी सरपंच मच्छिंद्र देसाई, उपसरपंच निशा शिगावकर, पंचसदस्य खुशी वेळीप, आरुषी सावंत, मनिष लांबोर, नंदेश देसाई, धारबांदोडा जि. पं. सदस्य सुधा गावकर, कालेचे सरपंच किशोर देसाई, श्री सातेरी महादेव रंगाई देवस्थान समितीचे अध्यक्ष नरेश शिगावकर, सचिव सत्यवान खेडेकर, आजोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ खेडेकर आदी उपस्थित होते. खुशी वेळीप व एकनाथ खेडेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सत्यवान खेडेकर व यशवंत वेरेकर यांनी तर आरुषी सावंत यांनी आभार मानले.