वृत्तसंस्था /माजीन (जम्मू)
जम्मूचे उपनगर माजीन येथे बालाजी मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. एका भव्य कार्यक्रमात, भक्तीभावाच्या वातावरणात आणि मंत्रोच्चारात हे मंदिर गुरुवारी भक्तांसाठी सुरू करण्यात आले. हा कार्यक्रम या प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि किशन रे•ाr उपस्थित होते. हे भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर 62 एकर क्षेत्रात उभारण्यात आले असून ते शिवालिक टेकड्यांच्या खालच्या भागातील वनप्रदेशात आहे. उद्घाटन कार्यक्रमाला जम्मू-काश्मीरच्या विविध भागांमधून सहस्रावधी भाविक आले होते. या सर्वांनी नंतर मंदिराच्या गाभाऱ्यातील व्यंकटेश्वरा स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेतले. आंध्र प्रदेशातूनही असंख्य भाविक या कार्यक्रमासाठी आले होते. जम्मू-काश्मीरच्या सनातन इतिहासातील हा महत्वाचा क्षण आहे, असे उद्गार मनोज सिन्हा यांनी काढले.
धार्मिक पर्यटन वाढणार
या मंदिरामुळे जम्मू-काश्मीरच्या धार्मिक पर्यटनाचे संवर्धन होणार आहे. यामुळे या प्रदेशाच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. वेदिन संस्थान, वैष्णोदेवी स्थान मंडळ आणि श्री कैलास ज्योतिष आदी संस्था या भागात वेदिक संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांमुळेच हे मंदिर आज निर्माण झाले आहे. कालांतराने या मंदिराच्या परिसरात तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थेकडून एका वेदपाठशाळेचे तसेच वैद्यकीय सेवा केंद्राचे निर्माण केले जाणार आहे, अशी माहिती उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे.