प्रतिनिधी /वाळपई
शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी पालक शिक्षक व विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आज समाजामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र या शैक्षणिक संस्था मुलांवर शिक्षणाबरोबरच संस्कार करण्यात खरोखरच यशस्वी ठरतात का? हा संशोधनाचा प्रश्न आहे. मात्र सत्तरी तालुक्मयासारख्या ग्रामीण भागात केरी येथे कार्यरत असलेल्या विवेकानंद विद्यालयाच्या मुलांवर चांगले संस्कार होत आहेत, असे प्रतिपादन कलर कोन एशिया प्रायव्हेट लिमिटेडचे ग्लोबल अकाऊंट व्यवस्थापक रघुनाथन रामकुमार यांनी केले.
केरी सत्तरीच्या स्वामी विवेकानंद संघ शिक्षण संस्था संचलित विवेकानंद ज्ञानमंदिर हायस्कूलला कलर कोन एशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे व्यवसायिक सामाजिक जबाबदारी या योजनेअंतर्गत निर्माण करून दिलेल्या संगणक वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद गावस? विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गोपीनाथ गावस, कलर कोन एशिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकारी डिलायला परेरा, संस्थेचे माजी अध्यक्ष नामदेव गावस, सचिव शिवाजी गाड, याह्या करोल, दिनेश माईणकर विद्यालयाचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमा माजिक व इतरांची खास उपस्थिती होती.
विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीपाद गावस यांनी या ग्रामीण भागातील शाळांमध्ये अनेक सुविधांची गरज असते. त्यामुळे अशा कंपन्या या सामाजिक स्तरावर आपले महत्त्वाचे योगदान देत आहे ही खरोखरच प्रत्येकासाठी एक वेगळा संदेश देणारी बाब आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संगणक वर्गाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन चंद्रशेखर गावस यांनी केले तर गोपीनाथ गावस यांनी आभार मानले.