मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश एल. विजयालक्ष्मीदेवी यांच्या हस्ते लोकार्पण
बेळगाव : वकिलांना व पक्षकारांना खटला दाखल करण्यासाठी ई-सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई-सेवा केंद्र आणि हेल्प डेस्क, याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षाचे उद्घाटन मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशा एल. विजयालक्ष्मीदेवी यांच्या हस्ते करण्यात आले. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातच त्याचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार व न्यायालय प्रशासन यांच्यावतीने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही खटल्याबाबतचा अर्ज किंवा दावा दाखल या ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून करता येणार आहे. मोबाईल किंवा लॅपटॉप तसेच संगणकाच्या साहाय्याने आपण हा खटला दाखल करू शकतो. ही सोय आता उपलब्ध करून देण्यात आली असून वकिलांनी जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घ्यावा, यासाठी ते अॅपही डाऊनलोड करावे, असे त्यांनी सांगितले. बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, कायदा सेवा प्राधिकारचे सचिव पी. मुरलीमोहन रे•ाr यांच्यासह न्यायालयाचे तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत व आभार न्यायालयाचे व्यवस्थापक राठोड यांनी मानले.