महांतेश कवटगीमठ यांच्या सहकार्यातून उभारणी
वार्ताहर /उचगाव
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभारण्यात आलेल्या हायमास्टचे उद्घाटन उचगावमधील वारकरी सांप्रदाय, सर्व युवक मंडळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव शाखा, दुर्गामाता दौड आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खास गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या फंडातून मंजूर झालेल्या दोन लाखाच्या निधीतून हायमास्ट उभारण्यात आला आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. हायमास्टचे पूजन सर्व वारकरी मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उचगावमधील वारकरी सांप्रदाय उपस्थित होता.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभागप्रमुख मिथील जाधव व दुर्गामाता दौड उचगाव प्रमुख नेहाल जाधव यांनी प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र दिला. उचगावच्या प्रवेशद्वारामध्ये हा हायमास्ट उभारण्याचा संकल्प शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्गामाता दौड व गावातील युवकांनी केला होता. या हायमास्टचा उपयोग उचगाव-कोवाड रोड, उचगाव ऍप्रोच रोड, मळेकरणी मार्ग, उचगावच्या प्रवेशद्वारात अशा सर्व रस्त्यांना होणार आहे. या संदर्भात महांतेश कवटगीमठ यांनी प्रत्यक्ष भेट दऊन सदर चौकामध्ये हायमास्ट गरजेचा आहे याची शहानिशा करून यासाठी दोन लाखाचा निधी दिला होता. या निधीतून हा हायमास्ट उभारण्यात आला आहे. हायमास्टमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रकाशमय झाला आहे.