वार्ताहर / हलगा
जगाला जगा व जगु द्या, असे सांगून अहिंसेचा संदेश जैन धर्माने दिला. या तत्त्वाप्रमाणे सर्वजण चालल्यास जगामध्ये शांतता व विकास होऊन मानवजातीचे कल्याण होईल. जैन धर्म हा प्राचीन असून यामध्ये अनेक धार्मिक चालीरीती आहेत. मुलांवर बालवयातच संस्कार केले पाहिजेत. तसे झाल्यास त्यांच्या भावी आयुष्यात चांगल्याप्रकारे जैन धर्माचे तत्त्व अंमलात आणतील व चांगले श्रावक श्राविका बनतील. जैन धर्मांची ही अखंड परंपरा पुढे तेवत ठेवतील. यासाठी लहान मुलांना व युवतींसाठी जैन धर्मसंस्कार शिबिर आयोजित करून हलगा गावच्या श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन कमिटीने एक आदर्श उपक्रम राबवला आहे, असे विचार हलगा येथील निवृत्त शिक्षिका कलावती पाटील यांनी केले. या संस्कार शिबिराच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. श्री 108 सिद्धसेन मुनी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात व मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हलगा येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन बस्ती आवारात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 22 पासून या शिबिराला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर पार्श्वनाथ दिगंबर जैन कमिटीचे अध्यक्ष धनु देसाई, महावीर अलारवाड, बाबू देसाई, राजेंद्र देसाई, अण्णासाहेब पाटील, चंदू देसाई, कलावती पाटील, संतोष कंगडगौडा, संजू पाटील, मिथुन शास्त्राr, अनेकानंदजी, विद्यासागर उपाध्ये उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या संस्कार शिबिराला सुरुवात करण्यात आली.
एकूण 300 सहभागी
हलगा गावातील सुमारे 300 बालक, युवक, युवती या शिबिरामध्ये सहभागी आहेत. लहान वयातच जैन धर्माचे संस्कार, धार्मिक रितीरिवाज कोणत्या प्रकारे करायचे याचे शिक्षण येथे दिले जात आहे. तसेच मुलांना निर्व्यसनी व धर्मरक्षण करण्यासाठीही शिक्षण दिले जात आहे. यामुळे हा एक स्तुत्य उपक्रम असल्यामुळे गावातील अनेक मुले या शिबिरामध्ये सहभागी होत आहेत. सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत हे शिबिर होत आहे. या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मिथुन शास्त्राr, अनेकानंदजी, कलावती पाटील, विद्यासागर उपाध्ये, शिक्षण देत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हलगा येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन कमिटीचे सदस्य, व जैन बांधव सहकार्य करीत आहेत.