प्रतिनिधी / वास्को
वास्को खारवीवाडा मच्छीमारी जेटीवर एका ट्रॉलरवरील सौर उर्जा यंत्रणेचे उद्घाटन वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, अखिल गोवा मच्छीमार ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोजा व इतर मान्यवर उपस्थित होते. सौर उर्जा निर्मितीसाठी मासेमारी ट्रॉलर उभारण्यात आलेला गोव्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
वास्कोतील वालांकनी नक्षत्र या मासेमारी ट्रॉलरवर ही सौर उर्जा यंत्रणा उभारण्यात आलेली असून गुरूवारी दुपारी तीचे उद्घाटन करण्यात आले. अशा प्रकारचा ट्रॉलरवरील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या यशा नंतरच इतर ट्रॉलर मालक सौर उर्जेकडे वळू शकतील अशी आशा आहे. वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी यावेळी बोलताना गोवा सरकार मोठय़ा प्रमाणात विकास करीत असून उर्जा विकासासाठीही योजना राबवीत आहे. बरीच उद्योग सौर उर्जेकडे वळत आहेत. मच्छीमारी व्यवसाय या उर्जेपासून दूर राहिलेला आहे. आता ट्रॉलरवरही सौर उर्जा उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वास्कोत प्रथमच असा प्रयोग करण्यात आलेला आहे. या योजनेत भविष्यात काही प्रमाणात बदलही होतील. देशात अधिकाअधिक सौर उर्जा उत्पादनासाठी प्रयत्न होत आहे. 600 मेगावॅटपेक्षा अधिक उर्जा निर्मितीची देशाला गरज आहे. त्यात सौर उर्जेने अधिक वाटा उचलावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गोव्यात मच्छीमारी ट्रॉलरवर सौर उर्जा उत्पादन केल्यास या व्यवसायीकांना काही प्रमाणात आर्थिक लाभ होईल. त्यांना ही यंत्रणा उभारण्यास सबसीडी देण्याबाबतही केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
यावेळी बोलताना मच्छीमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर म्हणाले की सध्या इंधनाचा वापर या मच्छीमारी व्यवसायीकांना खर्चिक ठरत आहे. त्यामुळे सौर उर्जेचा वापर होण्याची गरज आहे. डिझेलपेक्षा सौर उर्जेचा वापर झाल्यास लाभ होईल. केंद्रीय योजनांतूनही मच्छीमार व्यवसायीकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आमदार दाजी साळकर व आमदार संकल्प आमोणकर यांनीही सौर उर्जेचे महत्व विषद करून या उर्जेचा वापर करण्यात यावा असे आवाहन केले.