पुणे / प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या ‘स्वराज्य संघटने’चे राज्य मध्यवर्ती कार्यालय पुणे शहरात साकारण्यात आले असून, शिवाजीनगरमधील या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी 27 मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे. तर बालगंधर्व सभागृहात संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस व प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, गणेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, हे कार्यालय संघटनेचे मुख्य तथा मध्यवर्ती कार्यालय म्हणून कार्यान्वित होणार असून ‘स्वराज्य भवन’ या नावाने ओळखले जाणार आहे. शिवाजीनगर या पुण्याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी या कार्यालयाचे स्थान असून येथून विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, महानगरपालिका, शासकीय कार्यालये काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. या कार्यालयात पत्रकार परिषद, छोटे मेळावे, शिबिर, बैठका घेण्यासाठी छोटेखानी सभागृह आहे. तसेच स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष दालन असून महिन्यातील ठराविक दिवशी राज्यभरातील जनतेला याठिकाणी संभाजीराजे यांना भेटता येणार आहे. येथे असणारे पदाधिकाऱ्यांचे दालन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कार्यशील राहणार आहे. त्याच बरोबरीने या कार्यालयात सुसज्ज वॉर रूमदेखील साकारण्यात आलेली आहे.
संघटन बांधणी, प्रसिद्धी, बैठका तसेच जनतेला भेटण्यासाठी एक मध्यवर्ती केंद्र म्हणून स्वराज्य भवन कार्यरत राहील. कार्यालयाच्या लोकार्पण सोहळय़ासाठी छत्रपती संभाजीराजे, राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळय़ानंतर बालगंधर्व सभागृह येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनकरिता कोणत्याही प्रकारचा पास नसून, सर्व कार्यकर्त्यांना खुला प्रवेश आहे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. स्वराज्य भवन लोकार्पण सोहळा व अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. धनंजय जाधव, चित्रे पाटील, प्रशांत पाटणे, गणेश सोनवणे, रेश्माताई गोसावी, निखील काची यांनी येथे केले.