वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान शिक्षण क्षेत्राशी संबंधित 4,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याशिवाय ते आदिवासी बहुल छोटा उदयपूर जिह्यातील बोडेली शहरात एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. बोडेली येथील मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राज्य सरकारच्या ‘मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स’ उपक्रमांतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सचिव विनोद राव यांनी रविवारी सांगितले. तसेच राज्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित इतर अनेक नवीन योजनांचा पंतप्रधान शुभारंभ करतील. यामध्ये स्वामी विवेकानंद ज्ञान शक्ती निवासी शाळा, रक्षा शक्ती विद्यालय, मुख्यमंत्री ज्ञान सेतू मेरिट शिष्यवृत्ती आणि मुख्यमंत्री ज्ञान साधना मेरिट शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे.
मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स योजनेचा उद्देश शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून नवीन आणि स्मार्ट वर्गखोल्या आणि संगणक प्रयोगशाळा निर्माण करून राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे आहे. गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील अडालज गावात झालेल्या एका कार्यक्रमात ही योजना सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत, राज्य सरकार येत्या पाच वर्षांत सर्व 35,133 सरकारी आणि 5,847 अनुदानित शाळांना श्रेणीसुधारित करण्यासाठी 10,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.