सोयाबीन, मका दरात भरमसाट वाढ : पोल्ट्रीचालकांना फटका, व्यवसायावर परिणाम, अंडी दर वधारले
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांसाठी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोंबडय़ांच्या खाद्य दरात सातत्याने वाढ होत आहे. पोल्ट्रीचालक अडचणीत सापडले आहेत. शिवाय कोंबडी पालनासाठी लागणाऱया खर्चात वाढ झाली आहे. परिणामी अंडय़ांचे दर वाढले आहेत.
अलीकडे पोल्ट्री व्यवसाय करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. जिल्हय़ात जवळजवळ 10 हजारांहून अधिक पोल्ट्री फार्म आहेत. शिवाय घरगुती गावरान कोंबडी पालन करणाऱयांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात कोंबडी पालन केले जाते. विशेषतः या कोंबडय़ांसाठी बाजरी, मका, कनकी, ज्वारी, सोयाबीन आदींचा वापर केला जातो. सोयाबीन आणि मका दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालनासाठी लागणाऱया खाद्यदरातही वाढ झाली आहे.
पशुखाद्यांबरोबर कोंबडय़ांचे खाद्यही महागले आहे. सोयाबीन, कनकी आणि मका या कच्च्या मालाचे दर वाढल्याने कोंबडी आहाराच्या दरावर परिणाम झाला आहे. मागील दोन वर्षात कोरोना, बर्ल्ड फ्ल्यूच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला होता. दरम्यान अनेकवेळा कोंबडय़ा रस्त्यावर टाकण्याची वेळ आली होती. परिणामी अनेकांनी पोल्ट्री बंद देखील केल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीला देखील तोंड देत अनेकांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र आता कोंबडय़ांना लागणाऱया खाद्यदरात 10 ते 15 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय चालविणे जिकिरीचे बनले आहे.
आर्थिक बजेट कोलमडले
कोंबडय़ांना खाद्य म्हणून मका, सोया आणि कनकीचा वापर केला जातो. मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्याने कोंबडय़ांचे खाद्यदर वाढले आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. पक्ष्यांना दररोज मोठय़ा प्रमाणात खाद्य लागते. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
– एन. के. नलवडे (पोल्ट्री व्यवसायिक, बेळवट्टी)
जिल्हय़ातील पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या
तालुके | एकूण पोल्ट्री फार्म |
अथणी | 88 |
बैलहेंगल | 69 |
बेळगाव | 176 |
चिकोडी | 81 |
गोकाक | 51 |
हुक्केरी | 35 |
खानापूर | 101 |
रायबाग | 208 |
रामदुर्ग | 40 |
सौंदत्ती | 12 |
एकूण | 861 |