दरामध्ये घसरण : बाजारात विविध ठिकाणी विक्री
प्रतिनिधी /बेळगाव
मागील पंधरा दिवसांपासून बाजारात हिरवा वाटाणा (मटार) दाखल होऊ लागला आहे. शहरातील विविध ठिकाणी आवक वाढत असून विक्रीदेखील वाढली आहे. विशेषत: 80 रुपये किलो दराने विकणारा हा वाटाणा आता 50 रुपयांवर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे सोयिस्कर झाले आहे. हिवाळ्यात या वाटाण्याचे उत्पादन सुरू होते. त्याप्रमाणे आता आवक वाढू लागली आहे. त्याबरोबर हिरवा वाटाणादेखील बाजारात येऊ लागला आहे.
शनिवारी बाजारात हिरवा वाटाण्याची आवक वाढली होती. शिवाय मार्गशीर्षमुळे महिलावर्गाकडून खरेदीदेखील वाढली होती. पालेभाज्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्याबरोबर हिरवा वाटाणाही कमी झाला आहे. शहरातील गणपत गल्ली, काकतीवेस रोड, शनिवार खूट, मारुती गल्ली, कोतवाल गल्ली, समादेवी गल्ली आदी ठिकाणी हिरवा वाटाणा आणि हरभऱ्याची विक्री सुरू आहे.
मागील आठवड्यात वातावरणात मोठा बदल झाला होता. त्यामुळे कडधान्यावर याचा परिणाम झाला आहे. ढगाळ वातावरण आणि मध्येच पावसाचा शिडकावा यामुळे कडधान्यावर कीडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हिरवा वाटाणा आणि हरभऱ्यावरदेखील याचा परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या काळात हिरवा वाटाणा आणि हरभऱ्याचे दर वाढतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.