30 जूनपर्यंत जुना पास चालणार
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारपासून शाळांना प्रारंभ झाल्याने बसने प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
कोरोनानंतर बससेवा सुरळीत झाल्याने परिवहनचा महसूलही वाढला आहे. त्याबरोबर विविध भागात बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावात बससेवा सुरू आहे. मागील महिनाभर शाळांना सुट्टी असल्याने बसला केवळ नागरिकांची गर्दी होत होती. मात्र आता शाळांना पुन्हा प्रारंभ झाल्याने बसला विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे.
बसपासच्या माध्यमातून 58 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवास करतात. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा शैक्षणिक वर्षाला लवकर प्रारंभ झाला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत जुन्या पासच्या आधारे प्रवास करता येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसेसमध्ये विद्यार्थी अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत.