प्रवाशांना फटका, लांबपल्ल्याच्या बसेस फुल्ल,
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगी बसच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. प्रवास सुसाट आणि आरामदायी होत असला तरी पैसे जादा मोजावे लागत आहेत. विविध ठिकाणी धावणाऱ्या खासगी बसमधून जादा तिकीट आकारणी केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
उन्हाळी सुटीमुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विविध ठिकाणी पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबई, बेंगळूर, मंगळूर, पुणे, हैदराबाद, म्हैसूर आदी मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खासगी बस तिकीट आरक्षणदेखील फूल्ल होऊ लागले आहे. त्यामुळे काहीवेळेला तिकीट मिळेनासे झाले आहे.
बेळगाव, पुणे तिकीट दर 800 रुपये होता. तो आता 1200 रुपये झाला आहे. मुंबईसाठी 900 ते 1100 रुपये तिकीट दर होता तो आता 1300 ते 1500 रुपये झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसू लागला आहे. उन्हाळी सुटी आणि विविध कार्यक्रमांमुळे प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे खासगी बसनादेखील अच्छे दिन आले आहेत. मात्र तिकीटदरात वाढ झाल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी लांबपल्ल्यासाठी या बसेस विविध शहरांकडे धावत आहेत. मात्र प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.