शहरातील गाळेधारकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही व्यवसाय करत आहे. आम्हाला लीज वाढवून द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र आम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू असून जर आमची दुकाने काढून घेतली तर आम्ही रस्त्यावर येणार आहे. आम्ही मोठय़ा अडचणीत येणार असून दुकानांची लीज वाढवून द्यावी, अशी मागणी बेळगाव शहरातील व्यापारीवर्गाने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरामध्ये विविध ठिकाणी महापालिकेने गाळे बांधून आम्हाला दिले आहेत. आम्ही नियमीत भाडे देत आहे. सर्वप्रकारचा कर भरत आहे.वाढविलेले भाडेदेखील देण्यास तयार आहे, असे असताना गाळे खाली करण्यास सांगितले जात आहे. सध्या आम्ही व्यवसायात जम बसविला आहे. यावरच उदरनिर्वाह करत आहे. तेंव्हा लीज वाढवून द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी अमर कुगजी, युसुफ चावीवाले, पी. एन. बेळगुंदकर, बी. एल. घसारी, जे. के. मस्केवाले, आर. एन. काकडे, एस. एम. करेगार, ए. एच. कित्तूर, तुषार कुगजी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.