वृत्तसंस्था/ इंदूर
भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्ंयातील दुसरा एकदिवसीय सामना आज रविवारी खेळविला जाणार असून पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने पाटा खेळपट्टीवर चांगली खेळी करण्याची संधी गमावल्याने आपल्या नावावर धावा जमा करण्याच्या दृष्टीने तो उत्सुक असेल, तर आर. अश्विन मधल्या षटकांमध्ये बळींच्या शोधात असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह चार मुख्य खेळाडू नसूनही, भारत पहिला एकदिवसीय सामना आरामात जिंकू शकला आणि आता होळकर स्टेडियमवर मालिका जिंकण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल चालली आहे. या स्टेडियमवर सहसा भरपूर धावांचे सामने पाहायला मिळालेले आहेत.
मोहालीमध्ये भरपूर उष्णता आणि आर्द्रता अनुभवल्यानंतर येथील तापमान पावसाने खाली आणल्याने दोन्ही बाजूच्या खेळाडूंना वातावरण सुखावह वाटेल. शुक्रवारचा सामना भारतासाठी बराच सकारात्मक राहिला, याचे कारण प्रामुख्याने मोहम्मद शमी व सूर्यकुमार यादव यांची कामगिरी होती. भारताचा चौथ्या क्रमांकावरील फलंदाज अय्यर दुखापतीतून सावरून परत आलेला असला, तरी पाठीच्या दुखण्यामुळे त्याला आशिया चषकात खेळता आले नाही, तर शुक्रवारी केवळ 8 चेंडू खेळून तो धावबाद झाला. त्यामुळे येत्या दोन सामन्यांमध्ये भरभरून धावा जमविण्याची अपेक्षा तो बाळगून असेल
दुसरीकडे, अश्विनने नीटनेटकी गोलंदाजी केलेली असली, तरी तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जास्त अस्वस्थ करू शकला नाही. अक्षर पटेल वेळेत तंदुऊस्त न झाल्यास अश्विन भारताच्या विश्वचषक संघात शेवटच्या क्षणी प्रवेश करू शकतो. परंतु संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. आणखी एक ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला खेळण्याची संधी मिळते का हेही पाहावे लागेल. रविवारी तसे झाल्यास अश्विनला बाहेर बसावे लागेल.
शार्दुल ठाकूर देखील कामगिरी सुधारण्याच्या अपेक्षेत असेल. त्याने पहिल्या सामन्यात 10 षटकांत 78 धावा दिल्या. फलंदाजीत सूर्यकुमार यादवला एकदिवसीय सामन्यांत दीर्घकाळानंतर सूर गवसलेला आहे. भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियालाही सलामीच्या सामन्यात मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड या प्रमुख खेळाडूंची उणीव भासली. मोहालीतील सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने संकेत दिले की, ते 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतील.
ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिसने 45 चेंडूंत 45 धावा काढून अपेक्षा वाढविलेल्या आहेत. पण त्यांची मधली फळी अधिक सातत्यपूर्ण असणे गरजेचे आहे. अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दक्षिण आफ्रिकेतून फॉर्मात आलेला आहे. मोहालीमध्ये स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी चांगल्या सुरुवातीवर पुढे पाणी टाकले. ऑस्ट्रेलियाला मालिकेत पुनरागमन करायचे असल्यास या दोघांनी मोठे डाव खेळणे आवश्यक आहे.
संघ : भारत : के. एल. राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.