सामनावीर शमीचा भेदक मारा, गिल, गायकवाड, सूर्या, राहुल यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ मोहाली
मोहम्मद शमीचा भेदक मारा, सलामीवीर शुभमन गिल व ऋतुराज गायकवाड, तसेच सूर्यकुमार यादव व कर्णधार केएल राहुल यांनी नोंदवलेल्या शानदार अर्धशतकांच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 5 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. थीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड कपआधीची ही शेवटची मालिका आहे.
ऑस्ट्रेलियाला प्रथम मिळाल्यावर त्यांनी 50 षटकांत सर्व बाद 276 धावा जमविल्या. डेविड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय जोश इंग्लिश, स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी महत्वाचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या. त्यानंतर गिल व गायकवाड यांनी 142 धावांची भक्कम सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. नंतर सूर्यकुमार व राहुल यांनीही अर्धशतके नोंदवत भारताचा विजय 48.4 षटकांतच 5 बाद 281 धावा जमवित साकार केला. राहुलने षटकार ठोकून विजय साजरा केला. गिलने 63 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 74, गायकवाडने 77 चेंडूत 10 चौकारांसह 71, राहुलने 63 चेंडूत 4 चौकार, एक षटकार मारत नाबाद 58 धावा काढल्या तर सूर्यकुमार 49 चेंडूत 50 धावा काढून बाद झाला. त्याच्या खेळीत 5 चौकार, एका षटकाराचा समावेश होता. अय्यर 3 धावांवर बाद झाला तर जडेजा 3 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय इशान किशनने 18 धावा जमविल्या. या मालिकेतील दुसरा सामना इंदोरमध्ये रविवारी 24 रोजी होणार आहे.
प्रारंभी, भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला आमंत्रित केले. पहिल्याच षटकत मिचेल मार्शला बाद करत शमीने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. यानंतर डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 106 चेंडूत 94 धावांची भागिदारी केली. रविंद्र जडेजाने वॉर्नरला बाद करत जोडी फोडली. वॉर्नरने 53 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर स्मिथही लगेच तंबूत परतला. त्याने 41 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर मार्नस लाबुशेनने 39 तर कॅमरुन ग्रीनने 31 धावांची खेळी केली. लाबुशेन आणि ग्रीन यांच्यामध्ये 45 धावांची भागिदारी झाली. स्मिथ, लाबुशेन, ग्रीन आणि जोश इंग्लिंश यांना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. लाबुशेनला अश्विनने माघारी धाडले तर ग्रीनही स्वस्तात तंबूत परतला. यानंतर मार्क स्टोनिस आणि जोस इंग्लिंश यांनी चांगली भागिदारी केली. या दोघांनी 43 चेंडूत झटपट 64 धावांची भागिदारी केली. इंग्लिंशने 45 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 45 धावांचे योगदान दिले. स्टोनिसने 29 धावा काढल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 9 चेंडूत नाबाद 21 धावा करत संघाला पावणेतीनशेचा टप्पा गाठून दिला. इतर फलंदाजांनी मात्र त्याला साथ न दिल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांवर आटोपला.
भारताकडून मोहम्मद शमीने 51 धावांत सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. शार्दूल ठाकूर महागडा गोलंदाज ठरला. दहा षटकात 78 धावा देताना त्याला एकही विकेट मिळाली नाही.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 50 षटकांत सर्वबाद 276 (डेव्हिड वॉर्नर 52, स्टीव्ह स्मिथ 41, लाबुशेन 39, जोस इंग्लिश 45, पॅट कमिन्स नाबाद 21, शमी 51 धावांत 5 बळी). भारत 48.4 षटकांत 5 बाद 281 : गायकवाड 77 चेंडूत 71, गिल 63 चेंडूत 74, अय्यर 3, राहुल 63 चेंडूत नाबाद 58, इशान किशन 26 चेंडूत 18, सूर्यकुमार यादव 49 चेंडूत 50, जडेजा नाबाद 3, अवांतर 4. गोलंदाजी : झाम्पा 2-57, कमिन्स 1-44, अॅबॉट 1-56.
शमीची अशीही अनोखी कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. सोबतच काही खास विक्रम देखील नावावर केले. शमीच्या वनडे कारकिर्दीतील हा 93वा सामना होता. या सामन्यात त्याने न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा खास विक्रम मोडीत काढला. शमीने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 51 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्स नावावर केल्या. याचसोबत वनडे क्रिकेमधील त्याच्या विकेट्सची संख्या 170 पर्यंत पोहोचली. 93 वनडे सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत शमी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत पहिला क्रमांक ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मिचेल स्टार्कचा आहे. स्टार्कने 93 वनडे सामन्यांमध्ये 180 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट आहे, ज्याने 93 वनडे सामन्यांमध्ये 169 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, शमीच्या नावावर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये 37 विकेट्स आहेत. यासह तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय ठरला आहे. या यादीत कपिल देव 45 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहेत.
वनडेत 100 षटकार मारणारा वॉर्नर सातवा ऑस्ट्रेलियन
भारताविरुद्ध सामन्यात वॉर्नरने 53 चेंडूत 6 चौकार व दोन षटकारासह 52 धावा केल्या. यासह त्याने वनडेत 100 षटकारांचा टप्पा गाठला. वनडे क्रिकेटमध्ये 100 हून अधिक षटकार मारणारा तो ऑस्ट्रेलियाचा सातवा क्रिकेटपटू ठरला आहे. वॉर्नरने आतापर्यंत 148 वनडे सामन्यात 101 षटकार ठोकले आहेत. वॉर्नरपूर्वी रिकी पाँटिंग (159 षटकार), अॅडम गिलख्रिस्ट (148 षटकार), शेन वॉटसन (131 षटकार), अॅरॉन फिंच (129 षटकार), ग्लेन मॅक्सवेल (128 षटकार) आणि अँड्र्यू सायमंड्स (103 षटकार) यांनी अशी कामगिरी केली आहे.