विराट-राहुलची नाबाद शतके : कुलदीपचे पाच बळी : आज श्रीलंकेविरुद्ध लढत
वृत्तसंस्था/ कोलंबो
विराट कोहली व केएल राहुल यांच्या दमदार शतकी खेळीनंतर कुलदीप यादवने (25 धावांत 5 बळी) केलेल्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी धुव्वा उडवित दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतर विराट कोहली, केएल राहुल यांनी झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने 50 षटकांत 2 बाद 356 धावांचा डोंगर उभारला. या अवघड आव्हानाचा पाठलाग करताना पाकच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. यातच हॅरिस रौफ आणि नसीम शाह जखमी असल्यामुळे फलंदाजीला आले नाहीत. पाकिस्तान संघाने 32 षटकात 8 बाद 128 धावा केल्या. या विजयासह टीम इंडियाला दोन गुण मिळाले. आज टीम इंडियाची लढत कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इमाम उल हक स्वस्तात बाद झाला. अवघ्या 17 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर 43 धावसंख्येवर बाबर आझमला हार्दिक पांड्याने स्वस्तात तंबूत पाठवले. तर इमामचा अडथळा बुमराहने दूर केला. त्याने 9 धावा केल्या. मोहम्मद रिझवानही 2 धावांवर बाद झाल्याने पाकची 4 बाद 77 अशी स्थिती झाली होती. आगा सलमानने 23 तर इफ्तिकार अहमदने 23 धावा फटकावल्या. सलामीवीर फखर झमनने सर्वाधिक 27 धावांचे योगदान दिले. यातच वेगवान गोलंदाज नसीम शाह व हॅरिस रौफ जखमी असल्यामुळे फलंदाजीला आले नाही. यामुळे पाकला 32 षटकांत केवळ 128 धावाच करता आल्या. भारताकडून कुलदीप यादवने जबरदस्त गोलंदाजी करताना 25 धावांत 5 बळी मिळवले. कुलदीपच्या फिरकीसमोर पाक फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. बुमराह, हार्दिक पंड्या व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाक गोलंदाजांची धुलाई
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने 24.1 षटकांत 2 बाद 147 धावांची भक्कम मजल मारली होती. पण सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसास सुरुवात झाल्याने खेळ थांबवावा लागला. पंचांनी नंतर दोनदा निरीक्षणे केली. पण पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांनी रविवारी पुढे खेळ होणार नसल्याचे सांगितले. खेळ थांबवण्यात आला त्यावेळी कोहली 8 व केएल राहुल 17 धावांवर खेळत होते. या धावसंख्येवरून सोमवारी पुढे खेळाला सुरुवात केली. सामना सुरु झाल्यानंतर विराट आणि राहुलने पाकच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 233 धावांची अभेद्य भागिदारी करत भारताला 356 धावांपर्यंत पोहचवले. विशेष म्हणजे, तिसऱ्या विकेटसाठी भारताकडून ही सर्वोच्च भागीदारी ठरली तसेच आशिया चषकामधील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.
राहुलचे जबरदस्त कमबॅक
केएल राहुलने जवळपास सहा महिन्यानंतर टीम इंडियात कमबॅक केले. राहुलला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केले. राहुल आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. पण श्रेयस अय्यर जखमी झाल्याने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्याला संधी मिळाली, त्याचे त्याने सोनं केले. राहुलने 106 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारासह नाबाद 111 धावांची शानदार खेळी साकारली. त्याचे हे वनडेतील सहावे शतक ठरले. याचबरोबर राहुलने यावेळी वनडेमधील आपल्या 2 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कमबॅक करत असताना सामन्यात शतक आणि दोन हजार धावा असा योगायोग यावेळी चाहत्यांना पाहायला मिळाला. राहुलने कमबॅक करत असताना यावेळी ऑफ साइडला चांगली फटकेबाजी केली. पॉइंटच्या दिशेने त्याने जे फटके लगावले ते नजरेचे पारणे फेडणारे होते. शतक झाल्यावर राहुलने जो एक स्कुप शॉट खेळला तो अफलातून असाच होता.
विराटचे वनडेतील 47 वे शतक
पाकविरुद्ध सामन्यात विराटनेही शानदार खेळी साकारताना अवघ्या 94 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारासह नाबाद 122 धावा फटकावल्या. या अप्रतिम खेळीसह विराटचे हे वनडेतील 47 वे शतक ठरले. याशिवाय, या शतकादरम्यान किंग कोहलीने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आपल्या 13,000 धावा पूर्ण केल्या आणि या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज बनला आणि सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत विराटच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. त्याने 49 वनडे शतके ठोकली आहे. विराट सचिनशी बरोबरी करण्यापासून फक्त दोन शतके दूर आहे.
त्याआधी रविवारी कर्णधार रोहित शर्मा व गिल यांनी आक्रमक फलंदाजी करीत शानदार अर्धशतके नोंदवली. रोहितने 49 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 56 तर गिलने 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा फटकावल्या. या दोघांनी 100 चेंडूत 121 धावांची भागीदारी केली.
पाकिस्तानची गोलंदाजी आज कमकुवत जाणवत होती. हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो गोलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे गोलंदाजीची धार कमी जाणवली. शाहीन आफ्रिदीने 10 षटकात तब्बल 79 धावा देत एक बळी मिळवला. शादाब खानने एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांना मात्र अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 2 बाद 356 : रोहित शर्मा 49 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 56, गिल 52 चेंडूत 10 चौकारांसह 58, विराट कोहली 94 चेंडूत नाबाद 122, केएल राहुल 106 चेंडूत नाबाद 111 शाहीन आफ्रिदी 1-79, शदाब खान 1-71.
पाकिस्तान 32 षटकांत सर्वबाद 128 (फखर झमन 27, बाबर आझम 10, आगा सलमान 23, इफ्तिकार अहमद 23, कुलदीप यादव 25 धावांत 5 बळी, बुमराह, शार्दुल, हार्दिक प्रत्येकी एक बळी).
विराट 13 हजारी मनसबदार
कोलंबोमध्ये विराटने धावांचा पाऊस पाडला. त्याने कोलंबोत लागोपाठ चौथे शतक ठोकले आहे. विराटने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले. याशिवाय वनडेमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावांचा टप्पाही पार केला आहे. विराटने 267 वनडे डावात 13000 धावा पूर्ण केल्या. याचबरोबर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 13000 धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनला वनडेमध्ये 13000 धावा करण्यासाठी 321 डाव खेळावे लागले होते. विराटने याआधी वनडेमध्ये सर्वात वेगाने 8 हजार, 10 हजार, 11 हजार आणि 12 हजारचा टप्पा पार करण्याची कामगिरी केली आहे.
वनडेत सर्वात कमी डावात 13 हजार धावा करणारे फलंदाज-
- 267 – विराट कोहली
- 321 – सचिन तेंडुलकर
- 341 – रिकी पाँटिंग
- 363 – कुमार संगकारा
- 416 – सनथ जयसूर्या
कोलंबोत विराटचाच जलवा
कोलंबोमध्ये विराटने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर मागील चार डावात त्याने शतके ठोकली आहेत. आजच्या सामन्यात विराटने नाबाद 122 धावांची खेळी केली. त्याआधी झालेल्या तीन सामन्यात त्याने 128, 131 आणि 111 धावा चोपल्या आहेत. याशिवाय, बांगलादेशमधील मीरपूरमध्ये त्याने 4, त्रिनीदादमध्ये 3, विशाखापट्टणमध्ये तीन शतके झळकावली आहेत.