वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोमवारी झालेल्या पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारातील ब गटातील सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला 4-4 अशा गोलांनी बरोबरीत रोखले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने इंग्लंडवर 3-0 अशी आघाडी घेतली होती.
पूर्वार्धात भारतीय संघाचा खेळ इंग्लंडच्या तुलनेत अधिक दर्जेदार आणि आक्रमक झाला. या सामन्यात भारताच्या वरुण कुमारला पाच मिनिटांच्या कालावधीत पंचांनी दोनवेळा कार्ड दाखवले. भारताच्या तीन खेळाडूंना पूर्वार्धात पंचांनी कार्डे दाखविली. या सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दांडगाईचा धोकादायक खेळ केल्याबद्दल पंचांनी भारतीय संघातील गुर्जंत सिंगला दहा मिनिटांसाठी मैदानाबाहेर काढले होते. या सामन्यात तिसऱयाच मिनिटाला भारताचे खाते ललित उपाध्यायने उघडले. 13 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल मनदीप सिंगने केला. 22 व्या मिनिटाला मनदीप सिंगने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदविला. भारताचा चौथा गोल हरमनप्रित सिंगने पेनल्टी कॉर्नरवर 46 व्या मिनिटाला केला.
पूर्वार्धात इंग्लंड 3 गोलांनी पिछाडीवर होता. पण मध्यंतरानंतर उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाला आणि इंग्लंडच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी पाठोपाठ चढाया करत केवळ 11 मिनिटांच्या कालावधीत 4 गोल नोंदविले. इंग्लंडच्या लियाम ऍनसेलने 42 व्या मिनिटाला गोल केला. निक बेंडुरेकने 47 व्या आणि 53 व्या मिनिटाला असे दोन नोंदविले. फिल रोफेरने 54 व्या मिनिटाला इंग्लंडचा चौथा गोल नोंदवून भारताला या सामन्यात विजयापासून वंचित केले. हा सामना अखेर 4-4 असा बरोबरीत राहिला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत चार सामने झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. 2018 साली झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकासाठीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. सोमवारच्या सामन्यामध्ये भारतीय हॉकीपटूंनी मध्यंतरापर्यंत इंग्लंडवर चांगले दडपण राखले होते. पण उत्तरार्धात सामन्याचे चित्र पालटले. इंग्लंडच्या खेळाडूंनी बचावात्मक धोरण सोडून आक्रमक खेळ केल्याने त्यांना हा सामना बरोबरीत राखता आला. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारतीय गोलरक्षकाने इंग्लंडला गोल नोंदवण्यापासून थोपविले. आता या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना कॅनडाबरोबर बुधवारी होणार आहे.