वायुदलप्रमुखांचे राफेलमधून उड्डाण ः 4.5 पिढीच्या विमानाची गरज व्यक्त
वृत्तसंस्था/ जोधपूर
भारत आणि फ्रान्सच्या वायुदलाने मंगळवारी राजस्थानच्या जोधपूरमध्ये ‘गरुड’ युद्धाभ्यासात सहभाग घेतला आहे. यादरम्यान द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करणे आणि परस्परांच्या हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले आहे. तर फ्रान्सच्या वायुदलाचे प्रमुख जनरल स्टीफन मिले यांनी भारतीय-रशियन बनावटीच्या सुखोई-30 लढाऊ विमानातून उड्डाण केले.
‘गरुड’ हा युद्धाभ्यास आमच्या वैमानिक आणि चालकदलाला फ्रान्सच्या वायू तसेच अंतराळ दलाच्या (एफएएसएफ) सर्वोत्तम पॅकेजबद्दल माहिती देतो आणि अशाचप्रकारची संधी फ्रान्सला मिळते. भविष्यातील कुठल्याही प्रकारचय संघर्षात वायुशक्ती संघर्षाचे परिणाम निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार यात कुठलाच संशय नाही. अशाप्रकारचे युद्धाभ्यास आम्हाला आमच्या कौशल्यात भर करण्याची संधी प्रदान करतात, असे उद्गार वायुदलप्रमुख चौधरी यांनी जोधपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले.
भारतीय वायुदलाच्या आवश्यकतेनुसार आमच्या यादीत 4.5 पिढीच्या विमानांना सामील करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. निश्चितपणे आमची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 4.5 जनरेशन एअरक्राफ्टच्या (राफेल) 5-6 स्क्वाड्रन्सची गरज आहे. प्रेंच वायुदलाकडूनही राफेल लढाऊ विमानांचा वापर केला जातो. परंतु आम्ही राफेलसह अनेक अन्य विमानांचाही वापर करतो. मित्रराष्ट्रांसोबत कशाप्रकारे ताळमेळ राखला जावा, हे शिकणे महत्त्वपूर्ण असल्याचे वायुदलप्रमुखांनी म्हटले आहे.
अनेक लढाऊ विमानांचा सहभाग
भारतीय वायुसैनिकांसोबत उड्डाण करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. या युद्धाभ्यासावेळी आम्ही परस्परांना समजून घेऊ शकतो. एकत्र उड्डाण करणे आणि संचालन करण्यात सक्षम होणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रेंच वायुदलाचे प्रमुख जनरल स्टीफन मिले यांनी म्हटले आहे. गरुड युद्धाभ्यास 26 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता आणि तो 12 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. या युद्धाभ्यासात राफेल, तेजस, जग्वार आणि सुखोई-30 यासारख्या लढाऊ विमानांनी भाग घेतला आहे.