सर्वाधिक आठवेळा जिंकला आशिया चषक : अवघ्या 6.1 षटकांत जिंकला सामना
अंतिम फेरीत श्रीलंकेचा दहा गडी राखून केला पराभव: सामनावीर मोहम्मद सिराजचे 6 बळी
वृत्तसंस्था/ कोलंबो
मोहम्मद सिराजच्या (21 धावांत 6 बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दहा गडी राखून पराभव करत आशिया चषकावर नाव कोरले. कोलंबो येथे रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव 50 धावांत आटोपला. श्रीलंकेचे हे माफक आव्हान भारताने अवघ्या 6.1 षटकांत एकही विकेट न गमावता पार केले. शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. तसेच चेंडूच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला. हा सामना भारताने 263 चेंडू राखून जिंकला. 6 बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराजला सामनावीर तर मालिकेत 9 बळी घेणाऱ्या कुलदीप यादवला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, लंकन कर्णधार दसुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने कुसल परेराला बाद करत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पण यानंतर कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर मोहम्मद सिराज नावाचे वादळ आले. या वादळापुढे गतविजेत्या श्रीलंकेने अक्षरश : लोटांगण घातले. सिराजने एकापाठोपाठ एक सहा विकेट घेतल्या. सिराजने दमदार गोलंदाजी करताना 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. श्रीलंकेकडून यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावा केल्या. तर दुशान हेमंताने 13 धावा केल्या. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. तर पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. निसांका 2, परेरा 0, समरविक्रमा 0 असंलका 0, डी सल्वा 4 आणि शनाका 0 धावांवर तंबूत परतले. सिराज व हार्दिकच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 15.2 षटकांत 50 धावांवर आटोपला. हार्दिक पंड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या.
6.1 षटकांत जिंकला सामना
श्रीलंकेने दिलेले 51 धावांचे माफक आव्हान भारताने अवघ्या 6.1 षटकात आरामात पार करत हा सामना दहा विकेट्सनी जिंकला. शुबमन गिल आणि इशान किशन यांनी नाबाद 51 धावांची भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. गिलने 19 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावांची खेळी केली. तर इशान किशनने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 23 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 15.2 षटकांत सर्वबाद 50 (कुसल मेंडिस 17, दुशान हेमंता 13, वेल्लालगे 8, सिराज 6 बळी, हार्दिक 3 तर बुमराह 1 बळी)
भारत 6.1 षटकांत बिनबाद 51 (इशान किशन नाबाद 23, शुबमन गिल नाबाद 27).
सर्वाधिक आठवेळा जिंकला भारताने आशिया कप
रविवारी कोलंबोमध्ये टीम इंडियाने यजमान लंकेला पराभूत करत आठव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारताने ही स्पर्धा वनडेमध्ये 7 वेळा आणि टी-20 मध्ये एकदा जिंकली आहे, तर श्रीलंकेने 6 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेने वनडेमध्ये 5 वेळा आणि टी-20 मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तानचा संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.
24 वर्षापूर्वी पंगा घेणाऱ्या लंकेला भारताने दाखवला इंगा
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आशिच्या चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. 50 षटकाच्या या सामन्यात लंकन संघ 20 षटकेही खेळू शकला नाही. लंकेचा डाव अवघ्या 50 धावांवर आटोपला. श्रीलंकेला एवढ्या कमी धावसंख्येवर सर्वबाद करत भारताने 24 वर्षांनंतर बदला घेतला. 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये कोकोकोला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाला 54 धावांवर सर्वबाद केले होते. आता 24 वर्षांनंतर आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने सुवर्णसंधी साधत श्रीलंकेला 50 धावांवर सर्वबाद करत बदला घेतला.
फायनलमध्ये सिराजने नोंदवले अनेक विक्रम
- आशिया षकाच्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने एकट्याच्या जोरावर श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत पाठवला. संघाला अप्रतिम सुरुवात दिल्यानंतर रविवारी सिराजच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. सिराज भारतासाठी वनडे सामन्यात पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला आहे. पूर्वी हा विक्रम माजी दिग्गज जवागल श्रीनाथ यांच्या नावावर होता. वनडेमध्ये भारतासाठी पॉवरप्लेच्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स सिराजने घेतल्या आहेत. श्रीनाथ यांनी पॉवरप्लेच्या 10 षटकांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या, यापूर्वीचे सर्वोत्तम प्रदर्शन होते. यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे भुवनेश्व कुमार आणि जसप्रीत बुमराह यांची नावे आहेत. या दोघांनी देखील प्रत्येकी चार-चार विकेट्स पहिल्या 10 षटकात मिळवल्या होत्या.
वनडेत सिराज 50 बळी पूर्ण
दरम्यान, 21 धावांत 6 बळी घेत सिराजने वनडे क्रिकेटमध्ये 50 बळींचा टप्पा पूर्ण केला. वनडेमध्ये भारतासाठी सर्वात जलद 50 विकेट्स घेण्याच्या बाबतीत, सिराजने मोहम्मदचा शमीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सिराजने 29 व्या एकदिवसीय सामन्यात 50 विकेट्स पूर्ण केले तर याआधी शमीने 29 सामन्यात 50 विकेट्स घेतले होते. भारतासाठी अजित आगरकरने 23 सामन्यांमध्ये वनडेमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेतल्या आणि तो पहिल्या स्थानावर आहे तर सिराज आता शमीसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आला आहे.
लंकेच्या नावे अनोखा लाजिरवाणा विक्रम
आशिया चषकामध्ये सर्वात कमी 50 धावसंख्या आता श्रीलंकेच्या नावावर आहे. 2000 साली बांगलादेशचा विक्रम लंकेने तब्बल 23 वर्षांनी मोडला आहे. त्यानंतर सर्वात कमी धावसंख्येच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे. 2000 साली आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यात बांगलादेशचा डाव 87 धावांवर आटोपला होता. वनडे आशिया कपमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम बांगलादेशच्या नावावर आहे. यानंतर लंकेच्या नावे या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
सिराजचा असाही दानशूरपणा
अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत लंकेला दिवसा तारे दाखवले. त्याने 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे सिराजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. सिराजने पुरस्काराची रक्कम आणि सामनावीराचा किताब श्रीलंकेच्या ग्राऊंड्समनला दिला. सिराजच्या या दानशूरपणाची सध्या चर्चा होत आहे. सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून 5000 डॉलर (सुमारे 4.15 लाख रुपये) मिळाले. सिराजने औदार्य दाखवत ही रक्कम मैदानातील ग्राऊंड्समन्सना सुपूर्द केली. तो म्हणाला, हा रोख पुरस्कार मी ग्राऊंड्समन्सना देतो. ज्यांच्यामुळे हा आशिया चषक पार पडू शकला. ते या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्णच होऊ शकली नसती.
श्रीलंकेतील ग्राऊंड स्टाफवर पैशांचा पाऊस
आशिया कपमध्ये पावसाने रडीचा डाव खेळल्यानंतर श्रीलंकेच्या ग्राऊंड स्टाफने दाखवलेली जिद्द आणि मेहनत अवघ्या जगाने पाहिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खेळपट्टी आणि ग्राऊंड कोरडे करण्यासाठी स्टाफने केलेली मेहनत आदर्शवत होती. त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची दखल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी घेतली आहे. जय शाह यांनी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला 50,000 अमेरिकन डॉलर (42 लाख रुपये) जाहीर केले आहेत. याबरोबरच शाह यांनी प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफच्या कामाचेही कौतुक केले आहे. त्याच्या मेहनतीमुळेच आशिया चषकचा फायनल सामना विना अडथळा पार पडला, असे ट्विट त्यांनी केले आहे.
सर्वाधिक वेळा आशिया चषक खेळणारा रोहित पहिलाच खेळाडू
कर्णधार रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उतरून जबरदस्त विक्रम केला आहे. असा विक्रम सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी या दिग्गज खेळाडूंनाही जमला नाही आहे. भारताकडून सर्वाधिक आशिया चषक अंतिम सामना खेळण्याचा विक्रम रोहितने केला आहे. रोहित सर्वाधिक 5 वेळा आशिया चषकाचा अंतिम सामना खेळणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. विशेष म्हणजे, रोहितने आशिया चषकाचा सर्वात सर्वात पहिला अंतिम सामना 2008 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने 2010 च्या आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला. तसेच, 2016, 2018 आणि आता 2023 आशिया चषकाचा अंतिम सामना खेळण्याचा बहुमानही रोहितला मिळाला आहे. रोहितपाठोपाठ रवींद्र जडेजानेही या खास यादीत जागा मिळवली आहे. जडेजा चौथ्यांदा आशिया चषक अंतिम सामना खेळत आहे. जडेजा या यादीत चार खेळाडूंसोबत संयुक्तरीत्या दुस्रया स्थानी आहे.
सर्वाधिक आशिया चषक अंतिम सामना खेळणारे भारतीय
5 – रोहित शर्मा
4 – रवींद्र जडेजा
4 – मोहम्मद अझरुद्दीन
4 – एमएस धोनी
4 – नवज्योत सिंग सिद्धू
4 – सचिन तेंडुलकर.