वृत्तसंस्था /बार्सिलोना
स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आयोजित केलेल्या चार सामन्यांच्या हॉकी मालिकेत तिसऱ्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने नेदरलँड्सला 1-1 असे बरोबरीत रोखले. 2022-23 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉक प्रो लिग स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या स्पेनने पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला होता पण त्यानंतर बुधवारच्या सामन्यानंतर भारताने विजय नोंदवून बरोबरी साधली होती. गुरुवारच्या तिसऱ्या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंगने बाराव्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत भारताने नेदरलँड्सवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्यातील 40 व्या मिनिटाला जेस्पर ब्रिंकमनने नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. या सामन्यात दोन्ही संघांनी पेनल्टी कॉनर्सवर गोल नोंदवण्याची संधी अनेकवेळा गमावली. 12 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला दरम्यान कर्णधार हरमनप्रित सिंगने उपकर्णधार हार्दिक सिंगच्या मदतीने नेदरलँड्सवर हा पहिला गोल केला. या सामन्यातील तिसऱ्या सत्रात नेदरलँड्सने एकमेव गोल केला.