वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र स्पर्धेतील येथे मंगळवारी यजमान भारत आणि आशियाई चॅम्पियन्स कतार यांच्यात महत्त्वाचा आणि चुरशीचा फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे.
भारतीय फुटबॉल संघाने चार वर्षांपूर्वी बलाढ्या कतारला गोलशून्य बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला होता. या सामन्यातील भारतीय संघाची कामगिरी निश्चितच दर्जेदार म्हणावी लागेल. तसेच 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या कुवेत संघा विरूद्धच्या सामन्यात भारताने 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय नोंदविला. कुवेतने या सामन्यात कडवी लढत दिली होती.
2022 च्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र फेरी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा सामना डोहा येथे भारत आणि कतार यांच्यात 10 सप्टेंबर 2019 रोजी खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय फुटबॉलपटूंनी कतारचे आक्रमण शेवटच्या क्षणापर्यंत रोखले. आणि हा सामना गोलशून्य बरोबरीत राखला होता. आशियाई फुटबॉल क्षेत्रामध्ये कतारचा संघ हा बलाढ्या म्हणून ओळखला जातो. 2019 साली कतारने आशिया चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री खेळू शकला नव्हता.
मंगळवारी येथील कलिंगा स्टेडियमवर बलाढ्या कतार आणि यजमान भारत यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यात कतारचे पारडे भारताच्या तुलनेत निश्चितच जड आहे. पण भारतीय फुटबॉलपटू या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत कतारला विजयापासून रोखण्यासाठी प्रयत्नांची शिखस्त करतील. फिफाच्या मानांकनात कतार 61 व्या स्थनावर आहे. 16 नोव्हेंबर रोजी डोहा येथे झालेल्या सामन्यात कतारने अफगाणचा 8-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला होता. फिफाच्या मानांकनात भारत सध्या 102 व्या स्थानावर आहे. कतार संघातील हुकमी स्ट्राईकर अलमोझ अली याला मंगळवारच्या सामन्यात गोल करण्यापासून रोखण्याकरीता भारतीय फुटबॉलपटूंना कसरत करावी लागेल. 2019 च्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत कतारच्या अलमोझ अलीने सर्वाधिक म्हणजे 9 गोल नोंदविले होते. मंगळवारच्या सामन्यात जिक्सन सिंग आणि अनवर अली दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत मुंबई सीटी एफसी संघाविरुद्धच्या सामन्यात खेळताना जिक्सनला खांदा दुखापत झाली होती. मनवीर सिंग, समाध हे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहेत. या पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारत अ गटात असून कुवेत, अफगाण यांचा यामध्ये समावेश आहे. या गटातील आघाडीचे दोन संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील.