वृत्तसंस्था/ हांगझाऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी क्रीडा प्रकारात भारतीय हॉकी संघाने मंगळवारी सिंगापूरवर गोलांचा वर्षाव करत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंग आणि मनदीप सिंग यांनी शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. भारतीय हॉकी संघाने सिंगापूरचा 16-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या स्पर्धेतील झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने उझ्बेकस्तानचा 16-0 असा एकतर्फी पराभव केला होता. भारतीय संघातील खेळाडूंनी या दोन सामन्यात 32 गोल नोंदवण्याचा पराक्रम केला आहे. सांघिक हॉकी मानांकनात 49 व्या स्थानावर असलेल्या सिंगापूरला मंगळवारच्या सामन्यात केवळ एकमेव गोलावर समाधान मानावे लागले. या सामन्यात भारतातर्फे कर्णधार हरमनप्रित सिंगने 24 व्या, 39 व्या, 40 व्या आणि 42 व्या मिनिटाला असे चार गोल केले. मनदीप सिंगने 12 व्या, 30 व्या आणि 51 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवले. अभिषेकने 51 व्या आणि 52 व्या मिनिटाला तसेच वरुणकुमारने 55 व्या आणि 56 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. ललितकुमार उपाध्यायने 16 व्या मिनिटाला, गुरुजंत सिंगने 22 व्या मिनिटाला, विवेकसागर प्रसादने 23 व्या मिनिटाला, मनप्रित सिंगने 37 व्या मिनिटाला आणि समशेर सिंगने 38 व्या मिनिटाला गोल गोल नोंदवले. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना येत्या गुरुवारी विद्यमान विजेत्या जपानबरोबर होणार आहे.
मंगळवारी सिंगापूर आणि भारत यांच्यातील सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी संपुर्ण सामन्यात आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देत चेंडूवर ताबा राखला होता. 6 व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची पहिली संधी मिळाली होती. सुखजित सिंगचा फटका सिंगापूरच्या गोलरक्षकाने थोपवला. सातव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रितला या संधीचा फायदा उठवता आला नाही. 9 व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि मनदीप सिंगचा फटका सिंगापूरचा गोलरक्षक गुगनने अडवला. भारताच्या आघाडीफळीने आपले हल्ले चालूच ठेवले आणि त्यांना 12 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवण्याची संधी मिळाली. मनदीप सिंगने गुरुजंत सिंगच्या पासवर भारताचे खाते उघडले. या सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीचा वेळ संपण्यास शेवटची दोन मिनिटे बोकी असताना भारताला पाठोपाठ 3 पेनल्टी कॉनर्स मिळाले पण ते वाया गेले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताला एकूण 5 पेनल्टी कॉर्नर मिळाले.
या सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने पूर्ण चित्रच बदलले. या कालावधीत भारताने 5 गोल केले. 16 व्या मिनिटाला ललितकुमार उपाध्यायने भारताचा दुसरा गोल केला. 22 व्या मिनिटाला गुरुजंत सिंगने भारताचा तिसरा गोल नोंदवला. 23 व्या मिनिटाला विवेकसागर प्रसादने भारताचा चौथा गोल नोंदवला. 24 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रित सिंगने पेनल्टीवर भारताचा पाचवा गोल नोंदवला. मनदीप सिंगने 30 व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर संघाचा सहावा गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत भारताने सिंगापूरवर 6-0 अशी आघाडी घेतली होती.
सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर भारताला 11 वा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण हरमनप्रितचा फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने भारताला आघाडी वाढवता आली नाही. मनप्रितने 37 व्या मिनिटाला भारताचा सातवा गोल नोंदवला. यानंतर तीन मिनिटांच्या कालावधीत भारताने आणखी तीन गोल केले. त्यामध्ये हरमनप्रितने पेनल्टीवर दोन गोल करत आपली हॅट्ट्रिक साधली. त्यानंतर समशेर सिंगने भारताचा आणखी एक गोल 38 व्या मिनिटाला नोंदवला. भारताने आपल्या आक्रमनावर अधिक भर दिला होता. त्यामुळे भारताकडून सातत्याने गोलांचा वर्षाव शेवटपर्यंत झाला. भारताला आणखी दोन पेनल्टी मिळाले आणि हरमनप्रितने भारताची आघाडी वाढवली. सिंगापूरतर्फे एकमेव गोल झाकी झुलकेर्नेनने 53 व्या मिनिटाला केला. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना वरुणकुमारने पाठोपाठ दोन गोल पेनल्टीवर नोंदवले. या संपुर्ण सामन्यात भारताला 22 पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यापैकी 8 कॉर्नरवर भारताने गोल केले.