वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील आधार कार्ड व्यवस्था भक्कम आणि सुरक्षित असून 100 कोटींहून अधिक भारतीयांचा तिच्यावर दृढ विश्वास आहे, असे प्रतिपादन भारताकडून करण्यात आले आहे. मूडी या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थेने आधार व्यवस्थेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या संस्थेचे म्हणणे भारताने ठामपणे नाकारताना आधार व्यवस्थेतून झालेल्या लाभाकडे लक्ष वेधले आहे.
आधार यंत्रणा विश्वासार्ह आणि सुरक्षित नाही. आधारकार्डासाठी जमा केलेली नागरीकांची माहिती सहजगत्या अन्य लोकांच्या हाती सापडू शकते. भारताच्या विशिष्ट हवामानामुळे आधारची डिजिटल माहिती बिघडू शकते. ती कालांतराने निरुपयोगी होऊ शकते. आधारची बायोमेट्रिक यंत्रणा तत्पर नाही. या यंत्रणेतील दोषांमुळे अनेकदा आधार कार्ड धारकांना सेवा नाकारली जाते. लोकांच्या खासगीत्वाच्या अधिकाराचे संरक्षण ही यंत्रणा योग्य प्रकारे करु शकत नाही. या यंत्रणेचे नियंत्रण एकहाती आहे. ते सरकारच्या हातात आहे. या नियंत्रणाचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे या यंत्रणेचा दुरुपयोग होऊ शकतो, असे अनेक आक्षेप मूडी या संस्थेने घेतले होते. तसा अहवाल या संस्थेकडून गेल्या शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला होता. भारताने हा प्रत्येक आरोप खोडला आहे.
यंत्रणा सुरक्षित, अबाधित
आधार आणि विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडेंटीफिकेशन नंबर) ही व्यवस्था गेली कित्येक वर्षे सक्षमतेने काम करीत आहे. मूडींने व्यक्त केलेला दृष्टीकोन अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. मूडीने व्यक्त केलेला कोणताही आक्षेप अनुभवाच्या निकषावर टिकणारा नाही. आज भारतात एक अब्जाहून अधिक लोक याच व्यवस्थाचा उपयोग करुन सरकारी योजनांचा थेट लाभ घेत आहेत. व्यवस्थेसंबंधी त्यांची कोणतीही तक्रार नाही. याच आधार यंत्रणेच्या माध्यमातून आजवर भारतातील 100 कोटी हून अधिक लोकांना सातत्याने सरकारी योजनांचे लाभ दिले जात आहेत. अनुदानांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा केलीं जात आहे. तसेच करभरणा करणे, सरकारी सुविधांची बिले भरणे, पैशाचे व्यवहार करणे, बँकेत पैसे भरणे किंवा काढणे, आपल्या खात्यांमधील पैसे इतरांच्या खात्यांवर डिजिटल पद्धतीने हस्तांतरीत करणे, शेअर्स आणि रोख्यांचे खरेदी-विक्री व्यवहार करणे, जमीनींचे आणि स्थावर मालमत्तेचे खरेदी-विक्री व्यवहार करणे, वैद्यकीय सेवा, विमासेवा, जीवनावश्यक वस्तूंची सेवा, शिक्षण इत्यादी असंख्य व्यवहारांमध्ये आधार कार्ड व्यवस्थाच उपयोगात आणली जाते. ही व्यवस्था भक्कम नसती, तर मोठा गोंधळ उडून ती यंत्रणा बंद पडली असती किंवा बंद करावी लागली असती. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी या यंत्रणेचे कौतुक केले असून इतक्या प्रचंड लोकसंख्येच्या संदर्भात ती इतक्या कार्यक्षमतेने कशी उपयोगात आणली जाते यावर अभ्यासपूर्ण सकारात्मक मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे मूडीचे सर्व दावे खोटे ठरतात, असे केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहीती तंत्रज्ञान विभागाने ठणकावून प्रतिपादन केले आहे.
जगात सर्वात विश्वसनीय
आधार कार्ड व्यवस्था आणि विशिष्ट ओळख क्रमांक ही यंत्रणा जगात सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये एक अब्जाहून अधिक नागरीक या व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. त्यांनी या यंत्रणेवर त्यांच्या कृतीतून विश्वास व्यक्त केला असून तो नाकारणे संकुचितपणाचे लक्षण आहे. जे नागरीक या व्यवस्थेचा सहजगत्या उपयोग सातत्याने करु शकतात, त्यांच्या ज्ञानावर आणि क्षमतेवर शंका घेण्याचे काम कोणी केल्यास ते यशस्वी होणार नाही. मूडीच्या अहवालात सर्वेक्षण कसे करण्यात आले आणि कोणती माहिती कोणाकडून मागविण्यात आली याचे उत्तर नाही. या माहितीचे विश्लेषण कसे करण्यात आले आणि निष्कर्ष कसा करण्यात आला, ही माहिती देण्यात आलेली नाही. ही महत्वाची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली. याचाच अर्थ अहवाल अत्यंत त्रुटीपूर्ण आहे, हे सिद्ध होते, असे प्रत्युत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.