वृत्तसंस्था / हांगझोऊ (चीन)
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूष हॉकी या क्रीडा प्रकारात कर्णधार हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. सोमवारी येथे झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 12-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंग आणि मनदीप सिंग यानी शानदार हॅटट्रीक नेंदविली.
या सामन्यात भारतीय संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत बांगलादेशच्या बचावफळीवर दडपण आणले. या संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूनी आपले वर्चस्व राखले होते. कर्णधार हरमनप्रित सिंगने दुसऱ्या, चौथ्या आणि 32 व्या मिनिटाला असे तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवित हॅटट्रिक साधली. भारतीय संघातील मनदिप सिंगने 18 व्या, 24 व्या आणि 46 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवित हॅटट्रिक केली. ललितकुमार उपाध्यायने 23 व्या, अमित रोहिदासने 28 व्या, निलकांत शर्माने 47 व्या तर गुरूजंत सिंगने 56 व्या मिनिटाला प्रत्येकी 1 गोल केला. अभिषेकने 41 व्या आणि 57 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत अ गटात आघाडीचे स्थान मिळविताना एकही सामना गमविलेला नाही. आता या स्पर्धेत ब गटातील दुसऱ्या स्थानावर येणाऱ्या संघाबरोबर भारताचा बुधवारी उपांत्यफेरीचा सामना होईल.
सोमवारच्या सामन्यात भारताला 11 पेनल्टी कॉर्नरर्स मिळाले होते. आणि त्यापैकी 5 कॉर्नरवर भारताने गोल केले. या समान्यात भारताचे 7 मैदानी गोल नेंदविले गेले. या समान्यामध्ये बांगलादेशला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. सामन्याच्या मध्यतंरापर्यंत भारताने 6-0 अशी आघाडी बांगलादेशवर घेतली होती.