: 5-1 असा शानदार विजय : हरमनप्रीतचे दोन गोल
वृत्तसंस्था/ लंडन
कर्णधार हरमनप्रीत सिंगने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने प्रो लीग हॉकीमध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला 5-1 असे पराभूत केले. प्रो लीगच्या युरोप दौऱ्यात सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताला विजयी पुनरागमन करण्यात यश आले.
पहिल्या दोन सामन्यात हार पत्कारावी लागल्यानंतर भारतीय संघाने बेल्जियमविरुद्ध शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. सामन्यातील दुसऱ्याच मिनिटाला विवेक सागर प्रसादने शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात हरमनप्रीत सिंगने 20 व्या व 29 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नेंदवले तर 28 व्या मिनिटाला अमित रोहिदासने गोल करत भारताची आघाडी 4-0 अशी वाढवली. मध्यंतरानंतरही सामन्यावर भारताचे वर्चस्व राहिले. बेल्जियमकडून एकमेव गोल विल्यम गिल्सनने 45 व्या मिनिटाला केला. अखेरच्या सत्रात त्यांनी गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण भारताच्या भक्कम बचावासमोर त्यांना गोल नोंदवता आला नाही. 59 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने शानदार गोल करत भारताला 5-1 असे आघाडीवर नेले. यानंतर शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत भारतीय हॉकी संघाने हा सामना जिंकला.
युरोपियन टप्प्यात, 26 मे रोजी पहिल्या सामन्यात बेल्जियमकडून 1-2 आणि दुसऱ्या दिवशी ग्रेट ब्रिटनकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या टप्प्यात मात्र भारताने अप्रतिम सुरुवात केली. बेल्जियमविरुद्ध सुरुवातीलाच गोल केल्यावर संपूर्ण सामन्यात भारताने नियोजनबद्ध खेळ केला.
ग्रेट ब्रिटनविरुद्ध भारतीय संघच वरचढ
लंडन : एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला नमवल्यानंतर शनिवारी भारतीय संघाने आपला विजयी सिललिला कायम राखला. भारतीय पुरुष संघाने ग्रेट ब्रिटनविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 फरकाने विजय मिळवला. भारतीय संघाचा पुढील सामना दि. 7 रोजी हॉलंडविरुद्ध होईल.
बेल्जियमविरुद्ध विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने या सामन्यातही सुरेख खेळ साकारला. भारताकडून हरमनप्रीत सिंग (6 वे मिनिट), मनदीप सिंग (18 वे मिनिट), सुखजीत सिंग (27 वे मिनिट) तर अभिषेक (49 वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. ब्रिटनकडून वॉर्ड सॅमने चार गोल करत सामन्यात 4-4 अशी बरोबरी साधली. यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यामध्ये भारताने 4-2 अशी बाजी मारत शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने प्रो हॉकी लीगच्या गुणतालिकेत 24 गुणासह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अव्वल स्थानी असणाऱ्या ग्रेट ब्रिटनचे 25 गुण आहेत. स्पेनचा संघ 17 गुणासह तिसऱ्या तर ऑस्ट्रेलियन संघ 16 गुणासह चौथ्या स्थानी आहे. अर्जेटिना संघ 13 गुणासह पाचव्या स्थानावर आहे.