वृत्तसंस्था/ हांगझोयु
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी येथे खेळवण्यात आलेल्या महिलांच्या हॉकी क्रीडा प्रकारातील सामन्यात सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला दक्षिण कोरियाने 1-1 असे बरोबरीत रोखले.
या सामन्यात 12व्या मिनिटाला द. कोरियाचे खाते चो हेजिनने उघडले. मध्यंतरापर्यंत द. कोरियाने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. 44 व्या मिनिटाला नवनीन कौरने शानदार गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. जागतिक महिला हॉकी संघांच्या मानांकनात सहाव्या स्थानावरील भारताने या स्पर्धेत अ गटात सरस गोलसरासरीच्या जोरावर आघाडीचे स्थान मिळवले आहे. द. कोरियाला मानांकनात 12 वे स्थान मिळाले आहे. महिलांच्या हॉकी या प्रकारात आता प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
या क्रीडा प्रकारात भारताने सलामीच्या सामन्यात सिंगापूरचा 13-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला होता. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने मलेशियावर 6-0 अशी मात करून सलग दुसरा विजय नोंदवला होता. रविवारच्या सामन्यात भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवता आला नाही.