हांगझाऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरूष आणि महिला संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. फ गटातील झालेल्या लढतीत शनिवारी भारतीय पुरूष संघाने नेपाळचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. तर महिलांच्या विभागात भारताने ताजिकस्तानवर 3-0 अशी एकतर्फी मात केली.
पुरूषांच्या विभागातील झालेल्या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या मानव ठक्करने ताजिकस्तानच्या मेहमूदोव्हचा 11-8, 11-5, 11-8 अशा गेम्समध्ये पराभव करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मानवने हा सामना केवळ 17 मिनिटात जिंकला. दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या मनुष्य शहाने ताजिकस्तानचा सुलतोनोव्हवर 13-11, 11-7, 11-5 अशी मात करत भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. तिसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या हरमित देसाईने ताजिकस्तानच्या इस्माईलझोदाचा 11-1, 11-3, 11-5 असा पराभव करत ताजिकस्तानचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.
महिलांच्या विभागात भारताने नेपाळचा 3-0 असा फडशा पाडत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय संघांनी या गटातून आपले दोन्ही सामने जिंकत पुढील फेरी गाठली आहे. भारतीय महिला संघाचा पुढील फेरीतील सामना थायलंडशी होणार आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील लढतीत पहिल्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या दिया चितळेने नेपाळच्या सिक्का श्रेष्टाचा 11-1, 11-6, 11-8 तर दुसऱ्या सामन्यात भारताच्या सुतीर्थ मुखर्जीने नेपाळच्या इव्हाना थापाचा 11-1, 11-5, 11-2 तसेच तिसऱ्या एकेरी सामन्यात अहिका मुखर्जीने नबिता श्रेष्टाचा 11-3, 11-7, 11-2 असा पराभव केला.